गोमूत्रापासून कीटकनाशक गृहोद्योगावर कार्यशाळा Print

भंडारा / वार्ताहर
विषारी कीटकनाशके, कॅन्सर, दमा यांसारख्या रोगांना वाढवत आहेत, त्यांच्या किमतीही शेतकऱ्यांना परवडत नाहीत यावर उपाय म्हणून योगपीठ हरिद्वारद्वारा किसान पंचायतीच्या माध्यमातून गोमूत्रापासून कीटकनाशक बनविण्याचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधता हे विषमुक्त कीटकनाशक माफक किमतीत रेडिमेड मिळावे ही शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात आल्यावर भंडारा जिल्हा भारत स्वाभिमान, न्यास द्वारा गोमूत्रापासून कीटकनाशक निर्मितीचा गृहोद्योग या विषयावर भारत स्वाभिमान न्यास कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
 कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नंदाकिशोर खंते लाभले. कार्यशाळेचे अध्यक्ष भारत स्वाभिमान न्यासाचे जिल्हा प्रभारी रामबिलास सारडा होते. प्रास्ताविक प्रकाश कुकडकर यांनी केले. चर्चेत रामचंद्र मरघडे (मांगली), बुधाजी नखाते (चिचाळ), गंगाधर बावणकुळे, मोहित कुकडकर, राहुल शिंदे, रूपेश धुलासे, भास्कर तितरमारे, नरेंद्र मांडवकर, नामदेव हटवार यांनी भाग घेतला. पाहुण्यांचा परिचय महामंत्री गीता इलमे यांनी करून दिला. प्रत्येक शेतकऱ्याला स्वत: कीटकनाशक तयार करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता, गोमूत्रापासून कीटकनाशक निर्मितीचा गृहोद्योग उभारून ना नफा, ना तोटा या पद्धतीने समाजाला लाभ करून देणे शक्य आहे, असे सांगत कीटकनाशक तयार करण्याचा विधी रामबिलास सारडा यांनी सांगितला. ते म्हणाले, ५ लिटर गोमूत्रापासून एक एकर जमिनीला पुरेल इतके कीटकनाशक बनू शकते. ५ लिटर गोमूत्र, ३ किलो अधिक बियांच्या तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा किलो लसूण आणि ५ किलो वजनाचा कडुनिंबाचा किंवा धतुरा, एरंडी, तंबाखूचा पाला टाकून, घोळ करून, १ तास उकळवून निघालेल्या द्रावणात १०० लिटर पाणी टाकल्यावर कीटकनाशक बनते. हे बिनविषारी असून शेतीला लाभदायक ठरते, असे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. याचीच मोठय़ा प्रमाणात निर्मिती गृहोद्योगातून करता येणे शक्य आहे.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नंदाकिशोर खंते यांनी हा उद्योग उभारायला सुमारे ३ लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. शासकीय अनुदानाची उपलब्धता आहे. मार्केटही चांगले मिळेल सांगून तरुण उद्योजकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यशाळेत एक गाय किंवा म्हशीच्या शेण-मूत्रापासून १० एकर जमिनीवर विषमुक्त जैविक शेती करता येते. आभार पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी प्रा. वामन तुरिले यांनी मानले. संचालन मंदा खोटले यांनी केले.