संपकर्त्यां कर्मचाऱ्यांना एस.टी.चा ‘दे धक्का’ Print

गोंदिया / वार्ताहर   
विविध मागण्यांसाठी १७ व १८ सप्टेंबरला एस.टी.च्या चालक, वाहक व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी रजेचा अर्ज देऊन आंदोलन केले होते. त्यांच्या दोन दिवसांच्या आंदोलनामुळे गोंदिया आगारातील हजारावर बसफेऱ्या रद्द झाल्या. यामुळे गोंदिया आगाराला १० लाख ५ हजार, तर तिरोडा आगाराला ५ लाखांचे नुकसान सहन करावे लागले. ही भरपाई भरून काढण्यासाठी त्या सर्व आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांचा स्ट्राइक डिटेक्ट म्हणून १६ दिवसांची पगारकपात करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.
गोंदिया आगारातून ८ लाख ८४ हजार, तर तिरोडय़ातून ४ लाखांवर पगारकपात करण्यात आली आहे. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणारे एस.टी.चे कर्मचारी उपेक्षित जीवन जगतात. त्यांना अत्यल्प पगार दिला जातो. योग्य मोबदला मिळावा, यासाठी रास्त मागण्यांकरिता आंदोलन करण्याची नामुष्की संघटनेवर ओढवली होती. म्हणून आम्ही रजेचा अर्ज आगारप्रमुखांना देऊन आंदोलन केले होते. दोन दिवसांत कोणतीही अट न घालता मागण्या मंजूर झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते; परंतु २ दिवसांची हानी भरून काढण्यासाठी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारातून १६ दिवसांची पगारकपात केली आहे. संपामुळे जिल्ह्य़ात हजारावर फेऱ्या रद्द झाल्या होत्या, तर १० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला होता.
हे जरी वास्तव असले तरी आपल्या हक्क व अधिकारांसाठी प्रत्येकालाच लढण्याचा अधिकार असल्याचे महाराष्ट्र एस.टी. चालक-वाहक यांत्रिक युनियनचे िपटू चंदेल यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. एस.टी. कर्मचाऱ्यांना २ दिवसांचा संप चांगलाच भोवला आहे. पगारकपात करताना कोणतेही लेखी आदेश देण्यात आले नाही. आंदोलनाचे हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. पगारात कपात झाल्याने एस.टी. वाहक-चालकांना घरखर्च करणे कठीण झाले असून एस.टी. कर्मचाऱ्यांची एकता भंग करण्यासाठी प्रशासनाद्वारे असले कृत्य केले जात असल्याचा आरोपही चंदेल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे आमच्या संघटनेद्वारे याचा निषेध केला जात असून यापुढे आमच्यातील कोणताही कर्मचारी ‘ओव्हर टाइम’ करणार नाही. शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या हक्काच्या सुटीच्या दिवशी सर्व कर्मचारी एकाच दिवशी सुटी काढून दसऱ्याच्या दिवशी जिल्ह्य़ातील एस.टी. परत बंद पाडू, असा इशाराही चंदेल यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
एस.टी.च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, विनामान्य आंदोलन केल्यास प्रति दिवसामागे ८ दिवसांचा पगार कपात करण्याची तरतूद असल्याची माहिती दिली. यावरूनच दोन दिवसांमागे १६ दिवसांची पगारकपात करण्यात आली आहे. झालेल्या संपात गोंदिया आगारातून १३९ चालक, १४६ वाहक, ४१ मेकॅनिक व २ ऑफिस कर्मचारी, असे एकूण ३२८ कर्मचारी संपावर होते. यामुळे एस.टी.चे दोन दिवसांत १० लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या ३२८ कर्मचाऱ्यांच्या पगारातून १६ दिवसांप्रमाणे ८ लाख ८४ हजार रुपयांची पगारकपात करण्यात आली, तर तिरोडा आगारातूनही जवळजवळ दीडशे कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ लाख रुपयांची कपात करून एस.टी.ने त्यांना धक्का दिला आहे.