स्पार्कल निराली.. बंगळे दाम्पत्याने उलगडवले सुजाण पालकत्वाचे गूढ Print

बुलढाणा / प्रतिनिधी
निरालीमध्ये कुठलेही निराळेपण नाही. ती अगदी सर्वसामान्य मुलीसारखीच आहे. ती हसते अन् हट्ट न पुरविल्यास रडतेही, मात्र लहान मुलांमध्ये उपजतच असलेली सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, आक लनशक्ती, निरीक्षणशक्ती, श्रवणशक्ती, या गुणांचा तिच्यात विकास झाला तो स्पार्कल अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमुळे, अशा प्रांजळ भावना निरालीची आई आश्विनी व वडील गणेश बंगळे यांनी व्यक्त केल्या.
बंगळे दाम्पत्यामधील सुजाण पालकत्वाचे गूढ जाणून घेण्यासाठी आयोजित केलेली मुलाखत स्थानिक बुलढाणा अर्बनच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी पार पडली. या वेळी निरालीसह तिच्या आई-वडिलांना बोलते केले ते मुलाखतकार राजेंद्र काळे व डॉ. गणेश गायकवाड यांनी, तर या वेळी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद देशपांडे व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. महेश बाहेकर यांनी निरालीमधील निरालेपणाचे पैलू शास्त्रीय व मानसिकदृष्टय़ा विशद केले. यशवंत अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य नयना पाटील यांनीही निरालीबाबत पालकांना अवगत केले.
गणेश व आश्विनी बंगळे म्हणाल्या की, निराली जन्मत: हुशार असल्याबाबत आम्हाला कधी जाणवले नाही. तिचे निराली हे नाव कुठलाही निराळा विचार करून न ठेवता सहज ठेवले. वंशाला दिवा या संकल्पनेपेक्षा मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या. आम्ही निरालीकडून कुठल्याही अपेक्ष व्यक्त करीत नाही, मात्र एवढय़ा लहान वयात तिने एवढे ज्ञान अवगत केले. यामुळे तिचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यावे, ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही निरालीचे क ौतुक करून तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर केलेल्या संस्कारांबद्दल गौरवोद्गार काढले, तर डॉ. स्वाती लढ्ढा यांनी अशा अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा लाभ ग्रामीण मुलांनाही करून देण्याच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन मनीषा नारखेडे यांनी केले.