जिल्ह्य़ात ९१७ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या पदव्या Print

भंडारा / वार्ताहर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत, भंडारा जिल्हा केंद्रातून या वर्षी एकूण ९१७ विद्यार्थ्यांनी बी.ए. आणि बी.कॉम. या पदव्या प्राप्त केल्या.  पदवी वितरण कार्यक्रमात विशेष म्हणजे तान्ह्य़ा बाळाला सोबत घेऊन पदवी घेणाऱ्या माता, नोकरी करणारे प्रौढ, शिवाय पदव्या मिळविणारे वयोवृद्धही होते. पदवी वितरण समारंभ स्थानिक ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या पर्ल सभागृहात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोगतज्ज्ञ व समाजसेवी डॉ. सुधाकर जोशी, तसेच ब्रिटिश कौन्सिलच्या आंतरराष्ट्रीय शिक्षक- संवाद परिषदेचे सदस्य आणि ज.मु. पटेल महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अमोल पदवाड होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक सुभाष बेलसरे यांनी प्रास्ताविकात मुक्त विद्यापीठाच्या नवनवीन उपक्रम व विषयांची माहिती दिली आणि पारंपरिक महाविद्यालयात जाऊ न शकणाऱ्यांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रा. डॉ. अमोल पदवाड यांनी मुक्त विद्यापीठ व पारंपरिक विद्यापीठांनी एकत्र येऊन शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.  सहायक कुलसचिव विनोद वैद्य यांनी जिल्ह्य़ातून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या दहा विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. जिल्ह्य़ात प्रथम येण्याचा मान लाखनीच्या समर्थ महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ केंद्रातील बबली बावनकुळे यांनी मिळविला. डॉ. सुधाकरराव जोशी व अन्य मान्यवरांच्या हस्ते पदव्या प्रदान केल्या गेल्या. डॉ. जोशी यांनी याप्रसंगी ज्ञानासोबतच सुसंस्कृतपणा आत्मसात करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी समाजाच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम असावा, असे सांगून सुभाष बेलसरे यांनी नाशिकला विदर्भाच्या निकट आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पूजा गाझीमवार यांनी शारदास्तवन आणि पसायदान म्हटले. आभार भंडारा जिल्हा-केंद्राचे संचालक प्रा. सुमंत देशपांडे यांनी मानले. संचालन प्रा. नरेश आबिलकर यांनी केले.