स्त्री-पुरुष लिंगभेद हद्दपार करा -डॉ. कोलते Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
स्त्री-पुरुष हा लिंगभेद न पाळता समाजाने दोघांकडे मानव या समान दृष्टिकोनातून बघावे, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा कोलते यांनी केले. केंद्रीय समाजकल्याण बोर्ड व राज्य समाजकल्याण बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित व विनाअनुदानित संस्थांच्या प्रतिनिधींची एक दिवसीय प्रबोधन व प्रशिक्षण कार्यशाळा हॉटेल सिद्धार्थमध्ये पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. उद्घाटन समाजकल्याण बोर्डाच्या माजी अध्यक्ष शोभा पोटदुखे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण बोर्डाचे सचिव नरेश जेना, वाय.एल.मोरे, अ‍ॅड. राजेश्वर ढोक उपस्थित होते.
यावेळी डॉ. कोलते यांनी लिंगभेद समतोल व त्याचे फायदे व तोटे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. समाजात लिंगभेद होत असला तरी समाजाचे घटक म्हणून वावरणाऱ्यांनी हा भेद पाळू नये. लिंगभेदामुळे समाजात असमतोल निर्माण झाला आहे. समाज समतोल ठेवायचा असेल तर लिंगभेदाला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनपर भाषणात शोभा पोटदुखे यांनी कन्या भ्रूणहत्येचा विषय सविस्तर समजावून सांगितला. बीड येथे डॉ. मुंडे यांनी मुलींना गर्भातच मारण्याचा कत्तलखाना सुरू केला होता. राज्यात किंवा देशात असे कत्तलखाने किंवा डॉक्टर मिळाले तर त्यांना तेथेच कायद्याचा धाक दाखवून अटकाव करा, अन्यथा मुलींचा जन्मदर कमी होऊन अतिशय बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, हे त्यांनी उदाहरणांसह सांगितले.
समाजकल्याण खात्याचे सचिव नरेश जेना यांनी प्रास्ताविक केले. पाळणाघर, प्रौढ महिलांसाठी संक्षिप्त प्रशिक्षण वर्ग, नावीन्यपूर्ण योजना, जाणीव जागृती प्रकल्प, वर्किंग वुमेन्स, हॉस्टेल, कौटुंबिक सल्ला केंद्र, शॉर्ट स्टे होम या योजनांना अतिशय चांगला प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कौटुंबिक हिंसाचार या विषयावर अ‍ॅड. मंजूश्री खनके यांनी माहिती दिली. शेवटच्या सत्रात केंद्रीय बोर्डाच्या माहिती व आवेदनाबाबत नरेश जेना व वाय.एल. मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हय़ातील बहुतांश सर्व स्वयंसेवी संस्था व त्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी हजर होत्या.