गोंदिया रेल्वे स्थानक ‘ए प्लस’च्या वाटेवर! Print

गोंदिया / वार्ताहर
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेमार्गावरील नागपूर व रायपूरच्या दरम्यान असलेले महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. गोंदिया रेल्वे स्थानकाचा कायापालट होत असून ‘ए’ दर्जावरून ‘ए प्लस’च्या वाटेवर या रेल्वे स्थानकाचा प्रवास सुरू आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रति दिवशी ४० ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. येथून जवळपास २० ते २५ हजार तिकिटांची विक्री एका दिवसाला होते. एवढा लोकसंख्येच्या वर्दळीच्या ठिकाणाला स्वच्छ, सुंदर ठेवणे कठीण असले तरी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच हे रेल्वे स्थानक स्वच्छतेत नंबर वन बनले आहे. स्वच्छतेबरोबरच सुविधेतही नंबर वन असून मागील एका वर्षांत या रेल्वे स्थानकाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला आहे. सध्या या स्थानकाचा कायापालट करण्याच्या हेतूने युद्धस्तरावर काम चालू आहे. या रेल्वे स्थानकावर सद्यस्थितीत केवळ ४ प्लॅटफार्म आहेत. ते वाढविण्याचे काम सुरू असून येथे लवकरच ७ प्लॅटफार्म होणार आहेत. त्यामुळे येथून सुटणाऱ्या गाडय़ांचीही संख्या वाढणार आहे.  
स्टेशन प्रबंधक बी. व्ही. टी. राव यांनी ६ महिन्यांच्या कार्यकाळातच भरपूर बदल केला आहे. अलीकडे सर्वच ठिकाणी खर्रा, तंबाखू व पान खाऊन पिचकाऱ्या मारल्या जात असल्या तरी गोंदिया रेल्वे स्थानक याला अपवाद ठरला आहे. २४ तास या स्थानकावर स्वच्छता कर्मचारी सफाई करीत असल्याने दरुगधी नाही. रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी येथे सुविधा युक्त भव्य तिकीट घर, प्रतीक्षालय, हिरवेगार मल्टी फन्क्शनल कॉम्प्लेक्स, मोकळ्या जागेत बागकाम, सीमेंटीकरण, कुंडय़ांमध्ये रोपटे, स्वच्छ सुंदर कॅन्टीन, पाण्याची भरपूर व्यवस्था अशा विविध सुविधा आहेत. याबरोबरच स्थानकाच्या सुरक्षिततेबाबत तेवढीच खबरदारी घेतली जात आहे. येथील चोरटय़ांवर सीसीटीव्हीची २४ तास करडी नजर असून पोलीसही तेवढेच कार्यरत आहेत.
रेल्वे स्थानकावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून स्टॅण्डवर बेरिकेटस् लावण्यात येत आहेत. स्थानकावर बाहेरील प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी भव्य व्हीआयपी गेट होणार असून कार्यक्रमांसाठी मल्टिफन्क्शनल कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात आली आहे. संपूर्ण रेल्वे स्थानक रायपूर स्थानकाच्या धर्तीवर ग्रीन शेडेड होणार आहे. अपंगांच्या दृष्टीने रेल्वे स्थानकावर लिफ्टची व्यवस्था करण्यासंबंधीही विचाराधीन असल्याची ग्वाही रेल्वेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिली आहे. संपूर्ण परिसर कंपाऊंडने बंदिस्त होत असल्याने तिकीट चोरांच्या पायवाटाही बंद होत असल्याने रेल्वेला याचा मोठा फायदा होणार आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर-रायपूर दरम्यान सर्वागसुंदर सुविधायुक्त असे गोंदिया रेल्वे स्थानक, असेच उद्गार प्रत्येक प्रवाशाच्या मुखातून बाहेर पडताना दिसत आहेत.
संपूर्ण श्रेय सफाई कामगारांना
गोंदिया रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी स्थानकाला सर्वागसुंदर, स्वच्छ करून विकासाच्या वाटेवर नेण्यात येथील सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाशांनीही पान, खर्रा, तंबाखूपासून स्टेशन अस्वच्छ न करता स्वच्छता राखण्यास मदत करावी. प्रवाशांचे असेच सहकार्य लाभल्यास लवकरच स्थानकाला ‘ए प्लस’ दर्जा प्राप्त होईल, असे मत स्टेशन प्रबंधक बी.व्ही.टी. राव यांनी व्यक्त केले.