पहिलावहिला ‘आम्ही सारे’ कार्यकर्ता पुरस्कार प्रदान Print

अमरावती / प्रतिनिधी
‘आम्ही सारे’ फाऊंडेशनचा पहिला कार्यकर्ता पुरस्कार शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय विल्हेकर यांना हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. अमरावतीच्या विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रकांत वानखडे यांनी भूषविले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी प्रा. विठ्ठल वाघ, आमदार बच्चू कडू प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विल्हेकर दांपत्याला १ लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनने गौरवार्थ दिलेली संपूर्ण राशी विदर्भातील चार आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांना समर्पित करण्याची घोषणा विल्हेकर यांनी करताच सारे सभागृह सद्गदित झाले.
चंद्रकांत वानखडे यांनी या प्रसंगावर बोलताना गौरव राशी ही विल्हेकर कुटुंबांसाठीच असल्याने एवढीच रक्कम दसऱ्यापूर्वी चार शेतक ऱ्यांना देण्यात येईल आणि यासाठी सभागृहातील प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वानखडे म्हणाले, शेतकऱ्यांवर ओढवलेल्या कडेलोटाच्या प्रसंगात विजय विल्हेकर यांना हा पुरस्कार मिळत असून जगात चांगुलपणालाच किंमत असल्याचा प्रत्येय ठायीठायी येतो आहे. सज्जन प्रवृत्तीचे आकर्षण अजूनही संपलेले नाही. त्यामुळेच महात्मा गांधींना मरण नाही.
आमदार बच्चू कडू म्हणाले, हा सत्कार विचारासाठी लढा देणाऱ्यांना प्रेरणादायी ठरावा. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी विल्हेकरांसारख्या कार्यकर्त्यांला विधिमंडळात संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अमर हबीब म्हणाले, शेतकरी कधीच शेतक ऱ्यांना मतदान करीत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी विजय विल्हेकर लिखित ‘अंबर हंबर’ पुस्तकाचे प्रकाशन प्रा. विठ्ठल वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अविनाथ दुधे यांनी केले.