राजकीय आशयाविना लोकशाही कुचकामी - डॉ. सप्तर्षी Print

जैनबंधू पत्रकारिता पुरस्काराने गौरव
परभणी/वार्ताहर
अलीकडे सर्व निवडणुका पैशावर आधारित झाल्याने केवळ मतांची खरेदी-विक्री हेच निवडणुकांचे सूत्र झाले. अशा स्थितीत निवडणुकांत राजकीय आशय भरला जात नाही, तोवर लोकशाही कुचकामी ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
येथील हेमराज जैन प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या जैनबंधू पत्रकारिता पुरस्कार डॉ. सप्तर्षी यांना शारदा महाविद्यायाच्या प्रांगणात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यमंत्री फौजिया खान, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, हेमराज जैन, प्राचार्य मुलगीर, अनिल जैन आदी उपस्थित होते. डॉ. निमसे यांच्या हस्ते डॉ. सप्तर्षी यांना पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सत्य, अहिंसा व अपरिग्रह ही सत्याग्रहीची हत्यारे आहेत. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांला ही आयुधे समाजातून घ्यावी लागतात. सत्य जगाला ओरडून सांगण्याचे काम कार्यकर्त्यांने केलेच पाहिजे. आज राजकारणात सर्वत्र पैसा बोकाळला आहे. त्यातूनच निवडणुका अर्थकेंद्रित होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत जनतेने आपला विवेक जागा ठेवला पाहिजे. जिकडे जोर तिकडे धावण्याच्या काळात जनतेनेही सत्याचीच कास धरली पाहिजे, असे सांगत डॉ. सप्तर्षी यांनी सिंचन घोटाळा, राष्ट्रवादीचे राजकारण, राजकारणात पैशाचा वापर अशा अनेक विषयांना स्पर्श केला. आपण अजूनही आशावादी आहोत. सर्व काही बिघडले नाही. यातूनच चांगला समाज घडू शकतो, असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री खान यांनी डॉ. सप्तर्षी यांच्या कार्याचा गौरव करून समाजाला दिशा देण्यासाठी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि विचारवंतांची भूमिका ही नेहमीच मोलाची ठरते, असे सांगितले. डॉ. निमसे यांनी डॉ. सप्तर्षी यांच्या नगर जिल्ह्य़ातील आठवणींना उजाळा दिला. विद्यापीठीय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याशिवाय उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही, असेही डॉ. निमसे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमराज जैन यांनी केले. सूत्रसंचालन मातेकर यांनी केले. प्रा. भालेराव यांनी आभार मानले.