खिरोडा अपघातातील एस.टी.च्या दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न Print

बुलढाणा/प्रतिनिधी
जिल्हयातील खिरोडा एस.टी. बस अपघात प्रकरणी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर बसच्या सुदैवाने वाचलेल्या वाहकाने सदर बसचा अपघात हा स्टेअरिंगमधील तांत्रिक दोषाने झाल्याचे बयान एस.टी.च्या सुरक्षा यंत्रणेला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिकमाहिती अश की, शेगाव आगाराच्या शेगांव-पातूर्डा बस क्र. ६८६७ चा खिरोडा पुलावर दि.२६ सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. ही बस पुलावरून पूर्णा नदीच्या पात्रात क ोसळून १९ प्रवासी ठार झाले होते. तर १९ प्रवासी जखमी झाले होते. या बसचा चालक व्ही.एस.डाबेराव या अपघातात मृत्यूमुखी पडला.
बसचा वाहक मंगेश लोखंडे हा या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्या छातीला चार फ्रॅक्चर झाले आहेत. सुदैवाने तो वाचला. त्याने एस.टी.च्या सुरक्षा यंत्रणेला दिलेल्या माहितीनुसार सदर बसचे स्टेअरिंग तांत्रिक सदोष व जाम होते.
बसचा मृतक चालक याने २१ सप्टेंबर रोजी लेखी स्वरूपात आगार व्यवस्थापक व कर्मशाळा अधिक्षकाकडे तशी तक्रार केली होती. तोंडी स्वरूपात त्याने ही बाब वारंवार निदर्शनास आणून दिली होती.
वरिष्ठ अधिकारी बसच्या तांत्रिक दोषाकडे लक्ष देत नाहीत असा त्याचा रोष होता.
खिरोडा फाटयावरील अपघाताच्या वेळी तो स्टेंअरिंग.. स्टेंअरिंग असे जोरात ओरडला आणि काही क्षणातच अपघात झाला.
 गाडी चालविताना तो अजिबात नशेत नव्हता. हा रस्ता त्याचा नेहमीचा व पाठ झालेला होता. त्याची मानवी चूक नसताना हे प्रकरण त्याच्यावर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. वरिष्ठ अधिकारी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन त्या आधारे चुकीचा अहवाल घेत आहेत. या अपघाताच्या कारणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी कामगार नेते प्रमोद पोहरे यांनी केली आहे.
दरम्यान पोलिसांच्या परवानगी शिवाय सबंधित बस घटनास्थळावरून हलविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सबंधित बसचा स्टेअरिंग रॉड बदलण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकाराबद्दल शेगाव आगारातील चालक वाहक संतप्त असून भंगार गाडयांबद्दल त्यांच्यात कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.