शेतकऱ्यांनो बाजारपेठ काबीज करा -डॉ. गोयल Print

अकोला / प्रतिनिधी
शेतीत उत्पादन घेत शेतकऱ्यांनी बाजारपेठेत थेट मालाची विक्री करावी व बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन राज्याचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल यांनी केले. या माध्यमातून शेतकऱ्यांनी बाजारपेठेत प्रवेश करून मधली साखळी मोडण्याची गरज व्यक्त केली. राज्य शासनाच्या कृषी विभाग व नुजिविडू सीड्स या खाजगी कंपनीच्या संयुक्त भागीदारीअंतर्गत सधन कापूस लागवड प्रकल्पास त्यांनी आज भेट दिली. अकोला जिल्ह्य़ातील बेलखेड, हिवरखेड, तर अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर येथील कापूस पिकाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत नुजीविडू कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर.राव, उपाध्यक्ष विपणन के.व्यंकटराव, उपमहाव्यवस्थापक बी.बी.गावंडे यांची उपस्थिती होती.  राज्यातील ३४०० कापूस उत्पादकांच्या सुमारे दहा हजार हेक्टर शेतीवर सधन कापूस लागवड प्रकल्पातून संयुक्त भागीदारीत शेती करण्यात येत आहे. या शेतीत नुजिवीडू या सीड्स कंपनीच्या सहकार्याने कापसाचा हा पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून माती परीक्षण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कापूस उत्पादनासाठी आवश्यक खत व कीटकनाशकांचा वापर, चमत्कार हा पीक पोषक घटक या माध्यमातून कापूस उत्पादनात वाढ करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले असून त्यांनी गटागटाने शेती करत स्वयंविकास साधावा. कापसाचे एकत्रित पीक घेत त्यांचे जिनिंग प्रेसिंग करत थेट बाजारपेठेत शेतकऱ्यांनी गाठी विकाव्या, असा हा एकंदरीत प्रकल्प आहे. यात राज्य शासन व सहभागी खाजगी कंपनीचा सहभाग राहणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा अपेक्षित असल्याचे मत डॉ.सुधीरकुमार गोयल यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांच्या थेट शेतात जात कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष पीक पाहणी केली. त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.