.. तर रस्त्यासाठी पलढगवासी जिल्हाधिकाऱ्यांसमोर संसार थाटणार Print

बुलढाणा/ प्रतिनिधी
ज्ञानगंगा अभयारण्य परिसरातील व मोताळा तालुक्यातील पलढग या प्रकल्पग्रस्त गावाला गेल्या ६५ वर्षांंपासून जोडरस्ता नसल्याने या गावाला दळणवळण, शिक्षण, आरोग्य व अन्य नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बोरखेड ते पलढग हा जोडरस्ता तात्काळ बांधण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील नागरिक कुटुंबासह चुली मांडून संसार थाटतील, अशा आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा इशारा पलढगवासीयांनी दिला आहे. सुमारे एक ते दीड हजार लोकसंख्येचे आदिवासी व मागासवर्गीयाचे गांव जोडरस्ता व अन्य विकासापासून कोसो दूर आहे. या गावाच्या बाजूला पलढग सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे येथील सर्व नागरिक प्रकल्पग्रस्त झाले आहेत. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली तरी या गावासाठी पक्क्या जोडरस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवत शहर गाठावे लागत आहे. रुग्णांना शहरातील दवाखान्यात नेता येत नाही, तसेच रस्त्याअभावी बसेसचीसुद्धा व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. गावातील अनेक विद्यार्थ्यांनी अध्र्यावर शिक्षण सोडून दिले आहे. मुली बाहेरगावी शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. यावरही कळस म्हणजे, गावाला रस्ता नसल्यामुळे गावातील बऱ्याच मुलामुलींचे वैवाहिक संबंध जुळत नाहीत.  वास्तविक, रस्ते ही विकासाची धमनी समजली जाते. परंतु कित्येक वर्षांंपासून त्याअभावी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. विशेष म्हणजे, या गावाकडे लोकप्रतिनिधींचेसुद्धा अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. आठ दिवसात गाव व रस्त्याची पाहणी करून बोरखेड ते पलढग हा जोडरस्ता तात्काळ करण्यात यावा; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली मांडून संसार थाटण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गंगाधर तायडे, गजानन ढोकरे, रघुनाथ कांडेलकर, दिनकर पडोळकर, सुनील गायकवाड, साहेबराव गोरे, सूर्यभान कांडेलकर, प्रकाश शेवाळे, दयाराम पायगव्हाण, अनिल गायकवाड, प्रभू नावकर, विकास शेवाळे, विष्णू तायडे, भास्कर पडोळकर, नंदू गायकवाड, गणेश जाधव यांच्यासह ४७ ग्रामस्थांनी दिला आहे.