अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्री उत्सव Print

अमरावती / प्रतिनिधी
alt

सुमारे १ हजार वर्षांचा ज्ञात इतिहास लाभलेले येथील अंबादेवीचे मंदिर नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची पत्रिका अंबादेवीला पाठवली होती. अंबादेवीच्या मंदिराने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ओढ मात्र कमी झालेली नाही.कौंडण्यपूरचा राजा भिष्कम याने कन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता. तो रुक्मिणीला अमान्य होता. श्रीकृष्णाला तिने आपली इच्छा कळवल्यानंतर श्रीकृष्ण अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरात आले आणि त्यांनी रुक्मिणीचे हरण केले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. याच अंबादेवीचे स्थान जागृत समजले जाते. १९२७ च्या नझूल रेकॉर्डमध्ये अंबादेवीचे मंदिर हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे, याचा पुरावा सापडतो. भाजीबाजारातील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरातील शीलालेखावरूनही अंबादेवीचे मंदिर १०९७ मध्ये अस्तित्वात होते, असा उल्लेख आहे. ज्या मंदिराच्या साक्षीने रुक्मिणीहरणाचे नाटय़ घडले, ते अंबादेवीचे मंदिर परकीय आक्रमणाच्या काळात उध्वस्त झाले. नंतर सतराव्या शतकात तपस्वी जनार्दन स्वामी यांनी या मंदिराचा जीणोद्धार केला, असे उपलब्ध माहितीवरून कळते. अनेक वष्रे हे मंदिर दगडी खांबांवर उभे होते. अहल्याबाई होळकर यांनीही मंदिराच्या उभारणीत योगदान दिले. या मंदिराची उभारणी जुन्या पद्धतीची आहे. पूर्व भागातील प्रवेशद्वारातून आत गेल्यास सात-आठ पायऱ्या चढून सभामंडप आणि गाभाऱ्यात पोहोचता येते. सभामंडप लाकडी खांबांवर उभा आहे.
मंदिराच्या शिखरावरील कळस तांब्याचे असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. भारतातील शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या मंदिरातील काळ्या रंगाची वालुका पाषाणाची अंबादेवीची स्वयंभू मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. सणांखेरीज दर मंगळवारी आणि नवरात्राच्या काळात देवीला सुवर्णालंकार चढवले जातात. देवीचा मुकूट सोन्याने मढवलेला आहे. कपाळावर िबंदी, पायात वाळ्या, बुगडी, नथ, ठुशी, कमरपट्टा असे अनेक दागिने आहेत. देवीला नऊवारी साडी नेसवली जाते. मंदिरात नवरात्र महोत्सव अत्यंत थाटात साजरा केला जातो. यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रांगोळ्या, रोषणाई, फुलांच्या माळांनी मंदिर सजवले जाते. भजन, कीर्तन, प्रवचन, पूजा-अर्चना, नवचंडी  पाठ, गोंधळ, करुणाष्टके, सप्तशती पाठ, असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम होतात. अंबादेवी मार्गावर दुतर्फा अनेक दुकाने लावली जातात. नऊ दिवस मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते.
अंबादेवी मंदिराच्या दक्षिणेला एकविरा देवीचे प्रशस्त मंदिर आहे. अंबादेवीच्या दर्शनानंतर या मंदिरात पोहोचण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. जनार्दन स्वामी नावाचे तपस्वी या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांची समाधी एकविरा देवी मंदिर परिसरातच आहे. येथेही नवरात्रोत्सव साजरा केला जातो. एकविरा देवी मंदिरात कार्तिक वद्य तृतियेपासून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एकविरा देवीला अंबादेवीची मोठी बहीण मानतात. येत्या नऊ दिवसात ही दोन्ही मंदिरे भाविकांच्या गर्दीचा उच्चांक अनुभवणार आहेत.