बल्लारपुरात गोदामाला आग, ५० लाखाचा माल भस्मसात Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
बल्लारपुरातील गणपती वॉर्डातील मोहन गिदवानी यांच्या इमारतीला आग लागून वरच्या गोदामातील ५० लाखाचा माल भस्मसात झाला. ही आग शॉर्टसक्रीटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीत सौंदर्य दर्पण, गोपाल एजन्सी व व्होडाफोन ही तीन दुकाने होती, तर वरच्या व तळ मजल्यावर ठोक व्यापाऱ्यांच्या स्टेशनरी, जनरल स्टोअर्स व प्लास्टिकच्या वस्तूंचा माल खचाखच भरलेला होता. नवरात्री उत्सव व दिवाळीनिमित्ताने गोदामात माल भरून ठेवण्यात आलेला होता. पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास डॉ. कल्लूरवार हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागलेली दिसली. या घटनेची माहिती लागलीच अग्निशमन दल, पोलीस दलाला देण्यात आली. माहिती मिळताच बिल्ट, माणिकगड सिमेंट, अंबूजा सिमेंट, राजूरा व बल्लारपूर नगर पालिकेचे अग्निशमन दल आल्यावर आग विझवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू झाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास आग विझवण्यात यश आले, मात्र यात ५० लाखापेक्षा अधिक माल आगीत जळून भस्मसात झाला. या आगीत वरच्या मजल्यावरील गोदामातील संपूर्ण माल जळाला.