तीन बोगस डॉक्टरांच्या अटकेमुळे खळबळ Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
माणिकगड पहाडावरील जिवती व कोरपना या अतिशय दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळात असून पदवीशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तीन बोगस डॉक्टरला पाटण पोलिसांनी अटक केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजुरा तालुक्यातील माणिकगड पहाडावर आदिवासी कोलामांसह आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या लोकांचे वास्तव्य आहे. औद्योगिकदृष्टय़ा प्रगत असलेल्या तालुक्याला लागूनच दुर्गम जिवती व कोरपना हे दोन तालुके आहेत. शंभर टक्के आदिवासी असलेल्या या दोन तालुक्यांमध्ये सातत्याने बोगस डॉक्टर दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेची आरोग्य सुविधा येथे तात्काळ उपलब्ध होत नसल्याने या बोगस डॉक्टरांचा येथे अक्षरश: सुळसुळाट आहे. या भागातील लोकांवर अघोरी उपचार करायचे आणि त्या माध्यमातून पैसे कमवायचे, असा प्रकार डॉक्टरांनी सुरू केला आहे. मराठवाडय़ातील लातूर व नांदेड या दोन जिल्ह्य़ातून येथे आलेल्या तीन बोगस डॉक्टरला पाटण पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. पाटण गावातील आश्रमशाळा चौकात हरीशचंद्र श्रीपती निराडवाड (४०) मुक्ता हरीशचंद्र निराडवार (३५, रा.भातांगळी, जि. लातूर) हे दोघे काही वर्षांपूर्वी येथे वैद्यकीय व्यवसायासाठी येभन खासगी रुग्णालय सुरू केले, मात्र या दोघांकडे त्यासाठी आवश्यक पदवी किंवा इतर कुठलीही कागदपत्रे नव्हती. त्याचप्रमाणे राजू बळीराम फड (२५) हा डॉ. चंदेनखेडे यांच्या रुग्णालयात काम करत होता. वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना महिलांना लसीकरण करून अवैधरित्या दवाखाना थाटून बसला होता. पाटण पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्याजवळून मोठय़ा प्रमाणात साहित्य व औषध साठाही जप्त करण्यात आला.