धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला उसळला दीक्षाभूमीवर बुध्द बांधवांचा जनसागर Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
५६ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित या दोन दिवसीय सोहळ्याला बुध्द बांधवांचा जनसागर उसळला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व बाबासाहेबांचा अस्थिकलश भिक्खूगण व समता सैनिक दलाच्या सैनिकांसमवेत पथसंचालनासह भव्य आकर्षक मिरवणुकीव्दारे दीक्षाभूमीत आणण्यात आला. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भन्ते व पाहुण्यांनी सामूहिक बुध्दवंदना केली. यावेळी लाखो बौध्द बांधवांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अर्थात, येथील पवित्र दीक्षाभूमीवर १५ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. १५ तारखेला दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर धम्मध्वजारोहण करण्यात आले. धम्म समारंभाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले. यावेळी दिवसभर परिसंवाद झाले. यानंतर आज १६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता शहराच्या मध्यभागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व बाबासाहेबांचा अस्थिकलश भिक्खूगण व समता सैनिक दलाच्या सैनिकांसमवेत पथसंचालनासह भव्य आकर्षक मिरवणुकीद्वारे दीक्षाभूमी येथे आणण्यात आल्या. डॉ. आंबेडकर यांचा जयघोष करत अस्थी दीक्षाभूमीवर येताच दर्शनासाठी बौध्द बांधवांचा जनसागर उसळला. यानंतर या कार्यक्रमासाठी देशभरातून येथे आलेल्या भत्ने व भिखू संघाच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक बुध्दवंदना व धम्म प्रवचन झाले. यावेळी पंचशील ध्वज फडकवण्यात आला, तर आकाशात कबुतरे व फुगे सोडण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी बौध्द बांधवांसाठी दर्शनार्थ दीक्षाभूमीवर ठेवण्यात आल्या. दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेतले.
सायंकाळच्या प्रमुख सोहळ्याचे उद्घाटन हैदराबाद येथील भदन्त विनयरक्खीला थेरो यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पर्यावरण मंत्री व पालकमंत्री संजय देवतळे, आमदार सुभाष धोटे, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, दिलीप मेंढे, आचार्य जुगलकिशोर बौध्द, एन. एल. साव, शुध्दोधन अहिर, माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी.घोटेकर, श्रीलंका येथील नायके थेरो, भदन्त बानगला उपतिस्स, भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई, भदन्त नागवंश, भदन्त नागागोशा, भदन्त धम्मबोधी, भदन्त नागाप्रकाश, भदन्त नागसेन, भदन्त विनय बोधिप्रिय थेरो, भदन्त कश्यप, भदन्त धम्मपाल, भदन्त प्रज्ञानंद, भदन्त आनंद, भदन्त पञानंद, स्वागताध्यक्ष मारोतराव खोब्रागडे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अशोक घोटेकर होते. यावेळी देवतळे यांनी बौध्द बांधवांनी संघटित होऊन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
रात्री उशिरा सद्धम्माची गौरवगाथा व बुध्द-भीम गीतांचा कार्यक्रम झाला. या दोन दिवसीय सोहळ्यासाठी पवित्र दीक्षाभूजी सुसज्ज झाली होती. तोरण, पताका, धम्मध्वज, भोजन, पाणी, पुस्तकांचे स्टॉल, आरोग्य विभागाचा कक्ष व इतर सर्व सुविधा दीक्षाभूमीवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विविध संस्थांच्या वतीने येथे मोठय़ा प्रमाणात भोजनदान, तर बहुतांशा सामाजिक संस्थांनी आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या. या उत्सवासाठी जिल्हाभरातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे बौध्द बांधव आज येथे दाखल झाले होते. रेल्वे, बस, खासगी बसने हजारो बौध्द बांधव येथे आले होते. रात्री उशिरा या दोन दिवसीय धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाची अतिशय शांततेत सांगता झाली.