ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला Print

बुलढाणा जिल्ह्य़ात ३२४६ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला
बुलढाणा/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असून त्या निवडणूक रिंगणातील ३२४६ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ातील २७९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला. २७९ ग्रामपंचायतींबरोबरच ५३ प्रभागाच्या पोटनिवडणुका देखील पार पडणार असल्याने मोठय़ा प्रमाणावर अर्ज दाखल होतील, ही अटकळ खरी ठरली. २७९ ग्रामपंचायतींसाठी ६२४७, तर पोटनिवडणुकांसाठी १६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननीअंती १५१ अर्ज नामंजूर झाल्याने ६०५१ उमेदवार रिंगणात उरले, मात्र त्यानंतरच्या नाटय़मय घडामोडीत व विविध कारणांमुळे अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत मोठय़ा प्रमाणात उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे जिल्ह्य़ातील ३९ ग्रामपंचायती अविरोध झाल्या, तर २४ पोटनिवडणुका अविरोध झाल्या. या परिस्थितीत आता प्रत्यक्षात २४० ग्रामपंचायतींच्या व २३ पोटनिवडणुकांसाठी २१ ला मतदान होणार आहे. २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३१८४ उमेदवार, तर पोटनिवडणुकांसाठी ६२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यामुळे रिंगणातील ३२४६ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
यातच मतदारांच्या निरुत्साहामुळे या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या सर्वत्र खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांची धामधूम सुरू आहे. यामुळे मतदारराजा असलेला शेतकरी मोठय़ा प्रमाणात शेतात गुंतला आहे. खरीप हंगामाने फटका दिल्यामुळे नाराज झालेले शेतकरी कर्जबाजारी होऊन रब्बीच्या तयारीत गुंतले आहेत. यातच हाती आलेल्या खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, तूर या पिकांना शासनाच्या हमी भावापेक्षाही कमी भाव मिळत आहे. यामुळे मतदारांत निवडणुकीबद्दल चैतन्य वा उत्सुकताच नसल्याने मतदारांचा क ौल समजणे भल्या भल्या उमेदवारांनाही कठीण जात आहे. तसेच प्रचाराला कमी अवधी मिळाल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसून येत आहे.     

चिखली मतदारसंघातील ६ ग्रामपंचायती अविरोध
चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी सामंजस्याने निवडणुका पार पाडाव्यात, शक्य झाल्यास निवडणुकीला टाळून ग्रामपंचायती अविरोध अस्तित्वात याव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. अविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना ५ लाख रुपये विकास निधी देण्याचा मनोदय जाहीर केला. त्याचा चांगला परिणाम झाला असून मतदारसंघातील चिखली तालुक्यात ५ ग्रामपंचायती ३६ प्रभाग आणि १०४ उमेदवार अविरोध निवडून आल्याचे जाहीर झाले.
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये ९९ प्रभागातून २३१ पदांसाठी ६६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज ९९ प्रभागातून दाखल केले होते. पैकी अवैध उमेदवारी अर्ज वगळता रिंगणात असलेल्या ६४९ उमेदवारांपैकी आमदार राहुल बोंद्रे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २५३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. यामुळे ३६ प्रभागांत निवडणूक घेण्याची आवश्यकता उरली नसून, केवळ ६३ प्रभागांत १२७ पदांसाठी ३०४ उमेदवार आता निवडणूक लढवणार आहेत.
या सर्व प्रकरणात २८ ग्रामपंचायतींपैकी सोनेवाडी, मिसाळवाडी, डासाळा, कव्हळा आणि मुंगसरी या ५ ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत. याच धर्तीवर चिखली आमदार संघातील बुलढाणा तालुक्यातही ४ ग्रामपंचायतींपैकी इरला ग्रामपंचायतही अविरोध झाली असून उर्वरित ग्रामपंचायतींसह १२ प्रभागांपैकी ३ प्रभागातील ७ उमेदवार अविरोध निवडून आल्याचे घोषित झाले आहे. यामुळे एकूण मतदार संघातील ६ ग्रामपंचायती पूर्णपणे, तर ३९ प्रभाग व १११ उमेदवार अविरोध विजयी झाले आहेत. आमदार बोंद्रे यांनी अविरोध ग्रामपंचायतीला ५ लक्ष रुपये निधी देण्याचे घोषित केल्यानंतर काही तक्रारकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, अशा तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यांनी चांगल्या कामासाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी जर आचारसंहितेचा भंग होत असेल तर तो मी केला आहे, अशाही भावना व्यक्त केल्या.