साखर कामगार समन्वय समितीची अंबाजोगाईत रविवारी राज्य परिषद Print

जालना/वार्ताहर
राज्य साखर कामगार संघटना समन्वय समितीची राज्यपातळीवरील परिषद रविवारी (दि. २१) बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथे होणार असल्याची माहिती समन्वय समितीचे सरचिटणीस अण्णा सावंत यांनी दिली.
ऊसतोडणीसाठी प्रतिटन ३०० रुपये द्यावेत, मुकादमाचे कमिशन वाढवावे अशी मागणी परिषदेत करण्यात येणार आहे. गाडीवान कामगार व वाहतूकदारांच्या मोबदल्यात ५० टक्के वाढ करावी. साखर कामगारांची थकीत देणी देण्यासाठी केंद्राने दीड हजार कोटीचे पॅकेज जाहीर करावे. त्रिपक्षीय पगारवाढीचा करार २००९पासून लागू करावा. तुतेजा समितीच्या शिफारशी लागू कराव्यात. ऊसतोड मजुरांना विमा योजना व सामाजिक सुरक्षेसाठी महामंडळ स्थापन करावे. कारखान्यातील कार्यकारी संचालकाची नेमणूक साखर आयुक्तांमार्फ त व्हावी आदी मागण्या करण्यात येणार आहेत. आर्थिक डबघाईस आलेल्या व दिवाळखोरीत निघालेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची चौकशी करावी, बंद कारखाने सरकारने ताब्यात घेऊन पाच वर्षे चालवावेत, या मागण्याही करण्यात येणार आहेत. साखर कामगार, ऊसतोडणी मजूर, तसेच ऊसउत्पादक शेतकऱ्यांची ही परिषद आहे. डी. एल. कराड यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून, समन्वय समितीचे अध्यक्ष उद्धव भवलकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. डॉ. अशोक ढवळे, रघुनाथदादा पाटील, बबनराव पवार, सेवानिवृत्त साखर सहसंचालक के. ई. हरिदास यांची उपस्थिती परिषदेस राहणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.