श्री बालाजी महाराज यात्रेला येणार देशभरातील लाखो भाविक Print

बुलढाणा/प्रतिनिधी
देऊळगावराजा शहराचे ग्राम दैवत श्री बालाजी महाराज यात्रेला घटस्थापनेपासून सुरुवात झाली असून किमान एक महिना चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान बालाजीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजात राज्यासह देशभरातील लाखो भाविक दाखल होणार आहेत.
सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेले व सर्व भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री बालाजी महाराज प्रती तिरुपती बालाजी म्हणून ओळख आहे. लळिताच्या दिवशी दोन ते अडीच लाख भक्तगण शहरात आलेले असतात. घटस्थापनेपासून यात्रेला सुरुवात होऊन ही यात्रा दीपावलीपर्यंत चालते. २२ ऑक्टोबरला मंडपोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवाचे वैशिष्टय़ दोन फूट रुंद ४० फू ट लांब अशी एकवीस लाटी उभ्या करून मंडप टाकून मंडपोत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी नारळाची व रेवडय़ांची मोठय़ा प्रमाणात उधळण होते. ज्या व्यक्तीनी नारळ घेऊन वर हात केले त्यावेळेसच ते नारळ त्या व्यक्तीचे होते. हा मंडपोत्सव तब्बल १२ ते १४ तास चालतो.
२३ ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक होते. यात बालाजी महाराज यांची पालखी मिरवणूक रात्री ११ वाजता मंदिरापासून निघून आमना नदीमध्ये येते. त्यावेळी तिरुपती बालाजी येथे प्रगट होतात, अशी भक्तांची भावना आहे. पालखी नदीमधून सकाळी चार वाजता निघून डॉ. शिंदे हॉस्पिटलपासून शहरात प्रवेश करते. सायंकाळपर्यंत ही पालखी मिरवणूक चालू असते. सायंकाळी सहा ते सात वाजता पालखी मंदिरात जाते. लळीत उत्सव १ नोव्हेंबरला म्हणजे चतुर्थीच्या एक दिवस अगोदर होणार आहे. लळिताच्या दिवशी शहरात लाखो भाविक दाखल होतात. बालाजी महाराज यात्रा काळामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी असतात. प्रत्येक जातीधर्मातील लोकांना या काळात वेगवेगळे काम वाटून दिलेले असते. हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने येऊन यात्रा उत्सव साजरा करतात. असा उत्सव देशात क ोठेही पाहण्यात येत नाही. ही यात्रा १६ ऑक्टोबर ते कार्तिक उत्सव १४ नोव्हेंबरला साजरा करण्यात येते. एक महिना हा उत्सव चालतो.