पोलिसांना डोकेदुखी आणि टोळ्यांना रोखण्याचे आव्हानही Print

अमरावतीत झोपडपट्टय़ांमधून गुन्हेगारांना आश्रय
झोपडपट्टय़ामध्ये गुंडांचा सुळसुळाट
अमरावती / प्रतिनिधी
अमरावती शहर टोळीयुद्धामुळे अनेक वेळा वेठीस धरले गेले आहे. अनेक झोपडपट्टीदादांनी राजकीय पक्षांचा आश्रय घेतल्याने त्यांना आता उजळमाथ्याने वावरण्याची संधी मिळाली असली, तरी अवैध व्यवसायाच्या स्पध्रेतून किंवा राजकीय वैमनस्यातून टोळीयुद्धाचा भडका उडण्याचे प्रसंग घडले आहेत. जुगार आणि दारूभट्टय़ांवर सातत्याने कारवाई होऊनही यावर पोलीस यंत्रणेला अंकूश बसवता आलेला नाही. झोपडपट्टय़ांमधून गुन्हेगारांना मिळणारा आश्रय ही पोलिसांसमोरील मोठी डोकेदुखी ठरली आहे. अलीकडच्या काळात गंभीर गुन्ह्य़ांमध्ये घट झालेली असली, तरी टोळ्यांच्या कारवाया रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये जुगाराची १९२ प्रकरणे आढळून आली आणि सुमारे २३ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी कायद्याखाली ५०९ प्रकरणे उघडकीस आली, त्यात २४ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अंमली पदार्थाच्या तस्करीच्या १५ घटना समोर आल्या. यातून पोलिसांनी १३ लाख ५५ हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. हे एक हिमनगाचे टोक आहे. अवैध दारूनिर्मिती, जुगार आणि अंमली पदार्थाची तस्करी यातून फुलणाऱ्या गुन्हेगारीने आतापर्यंत शहरात अनेकांचे बळी घेतले आहेत.
अनेक झोपडपट्टय़ांमधून राजरोसपणे हे अवैध प्रकार चालतात. त्याचा प्रभाव झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या गरीब आणि कष्टाळू कुटुंबावरही होतो, पण त्यांच्याकडे गुन्हेगारी प्रवृत्तीला विरोध करण्याचे बळ नसते. अवैध व्यवसायातून होणारी हाणामारी ही तर सामान्य बाब होऊन बसली आहे. पोलिसांच्या नोंदींमध्ये या घटनांची नोंद होते. गुन्हेगारांना अटक केली जाते, नंतर त्यांची सुटका झाल्यावर पुन्हा गुन्हेगार आपल्या कामाला लागतात. गुंडांच्या दहशतीचा सामना मात्र सामान्य लोकांना करावा लागतो. अनेक प्रकरणे तर पोलिसांपर्यंत पोहोचतच नाही, असा अनुभव आहे.
काही वर्षांपूर्वी अमरावती शहराने टोळीयुद्धाची प्रचंड दहशत अनुभवली होती. एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाची टोळीयुद्धातून हत्या झाल्यानंतर त्याचे पडसाद अनेक दिवस शहरात उमटत होते. मध्यंतरीच्या काळात शहरात गुन्हेगारी कारवाया थंडावल्या होत्या, पण ही वरवरची शांतता होती. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय वैमनस्यातून पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकले आणि रिव्हॉल्व्हर, तलवारी चालल्या. काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली. नगरसेवक आणि त्याचे साथीदार पळून जाताना पोलिसांच्या नाकेबंदीत सापडले होते. त्यावेळी अनेक झोपडय़ांमध्ये पोलिसांना घातक शस्त्रे सापडली होती.
अमरावती शहरात सुमारे ३० टक्के लोक झोपडपट्टय़ांमध्ये राहतात. शहरात एकूण १२३ झोपडपट्टय़ा आहेत. त्यातील १०१ नोटीफाईड आणि २२ अननोटिफाईड आहेत. या व्यतिरिक्त शहरातील अनेक भागात झोपडय़ांची संख्या वाढत आहे, त्याची मोजदाद अजूनही झालेली नाही. अनेक झोपडपट्टय़ांमध्ये
सोयी-सुविधा नाहीत. गरीब कुटुंबांना इलाज नाही. झोपडपट्टीत जागा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक दलाल तयार
झाले आहेत. झोपडपट्टीदादांकडून खंडणी वसूल करण्यासाठीही हेच दलाल समोर असतात. सामान्य लोकांना गुंडांच्या कारवायांचे किस्से ऐकवून त्यांच्यात भीती निर्माण केली जाते आणि नंतर खंडणी देणे ही झोपडपट्टीवासीयांची सवय होऊन बनते.
अमरावती शहरात अनेक गुंडांनी राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घेऊन आपला मानमरातब वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी हे लोक सोयीचे असल्याने राजकीय पक्षांनी देखील त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे प्रकार वाढले आहेत. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा कारवाई करते. त्यातून काही दिवस लोकांना दिलासा मिळतो, पण आता गुन्हेगारांवर अंकूश ठेवण्यासाठी कडक उपाययोजना हवी, असा मतप्रवाह आहे.