आलेवाडी व अरकचेरी प्रकल्पामुळे सातपुडय़ातील आदिवासी उद्धवस्त होणार! Print

बुलढाणा / प्रतिनिधी
सातपुडय़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी व अरकचेरी या दोन सिंचन प्रकल्पामुळे प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील आदिवासींचे जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. हे प्रकल्प चुकीच्या तांत्रिक, आर्थिक व भौतिक निकषावर तयार केले जात असून त्यामुळे शासनाचा कोटय़वधीचा खर्च वायफळ जाणार आहे. या प्रकल्पामुळे अंबाबरवा वन्यजीव अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप आलेवाडी व अरकचेरी प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष बरकतभाई, पदाधिकारी भाऊ भोजने, आर.बी.कोथे, मुजाहीदअली यांनी पत्रकार परिषदेत केला.
बरकतभाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आलेवाडी व अरकचेरी हे सिंचन प्रकल्प तांत्रिक सदोष असतांनाही ते पूर्ण करण्याचा घाट राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने चालविला आहे.
आलेवाडी प्रकल्पांच्या बुडित क्षेत्रात आलेवाडी, सायखेड, चिचाली, लाडणापूर, वसाडी ही आदिवासी बहुल गावे आहेत, तर अलकचेरी सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात असलेली कामोद व पिंगळी ही आदिवासी गावे व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतात. या दोन्ही प्रकल्पांचे सर्वेक्षण चुकीच्या पध्दतीने करण्यात आले आहे.
प्रकल्प बांधकामासाठी चुकीचे अहवाल जलसंपदा मंत्रालयाला सादर करून या प्रकल्पाला तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळविण्यात आली. आलेवाडी प्रकल्पातील पाच गावातील २५८ व अलकचेरीमुळे २५०, अशी ४५८ कुटूंबे विस्थापित होणार आहेत. यापैकी बहुतांश कुटूंबे आदिवासीच आहेत.
या प्रकल्पांच्या नव्वद टक्के  भूसंपादनास या आदिवासी बहुलांचा तिव्र विरोध आहे. त्यामुळे भूसंपादन होऊ शकले नाही. सिंचनासाठी हे प्रकल्प केले जात असले तरी बुडित व लाभ क्षेत्रातील जमीन अगोदरच ओलीत आहे. जलसंपदा मंत्रालयातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, स्थानिक आमदार व प्रकल्पाचे कंत्राटदार यांनी संगनमताने निकषात न बसणारे हे प्रकल्प सुरू केल्याने क ोटय़वधी रुपयांचा भरूदड शासनाला बसणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे आदिवासी जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त होत अंबाबरवा अभयारण्य व परिसरातील वने, वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधता यांचा विनाश अटळ आहे. त्यामुळे या परिसरातील आदिवासींनी आपल्या जगण्या-मरण्याच्या अस्तित्वासाठी तीव्र संघर्ष सुरू केला आहे.
राज्यशासनाच्या जलसंपदा मंत्रालयाला व वनमंत्रालयाला आकडेवारी व सप्रमाण हा प्रकल्प मानवी जीवनास घातक असल्याचे पटवून देण्यात आले आहे तरीही त्यांनी प्रकल्प पूर्ण करण्याचा आपला हेका कायम ठेवला आहे. त्यामुळे दहा ते पंधरा क ोटी रुपयांचा अकारण खर्च झाला आहे.
धरणापूर्वीच आदिवासींचे मरण दिसत असून ते टाळण्यासाठी हे प्रकल्प रद्द करावेत, अशी बरकतभाई यांनी मागणी केली.