‘कापसाला हमी भावापेक्षा २० टक्के अधिक भाव द्या’ Print

प्रशांत देशमुख / वर्धा   
केंद्र शासनाने कापूस निर्यातीला अनुदान द्यावे व राज्य शासनाने हमीपेक्षा २० टक्के जास्त भाव कापसाला द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी जागतिक बाजारपेठेच्या पाश्र्वभूमीवर केली आहे.
देशांतर्गत त्यातही प्रामुख्याने पंजाब, हरियाणा व राजस्थानातील कापूस बाजारात मोठय़ा प्रमाणात येत आहे. त्या कापसाला ३४०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. विदर्भ-मराठवाडय़ातील कापूस उत्पादकांना ४ हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळण्याची आशा आहे, मात्र केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार कापसाची निर्यात सुरूच राहणार असल्याचे बोलत आहे, असा संदर्भ देऊन जावंधिया यांनी नमूद केले की, भारतातील कापड गिरणी मालकांनी २५ लाख कापूस गाठींच्या आयातीचे सौदे पूर्वीच करून टाकले आहेत. जागतिक बाजारात एक पौंड रुईचा भाव ८२ सेंट आहे. २०११ मध्ये हाच भाव २ डॉलर ४६ सेंट एवढा वाढल्याने भारतात कापसाला ६५०० रुपये, असा चांगला भाव मिळाला होता.
आता २ डॉलर ४६ सेंटवरून कापूस ८२ सेंटपर्यंत घसरूनही अमेरिकेचा कापूस उत्पादक आत्महत्या करीत नाही. असे कां, असा प्रश्न उपस्थित करीत जावंधिया यांनी निदर्शनास आणले की, अमेरिकेत कापूस उत्पादकांना २२ हजार कोटी रुपयांचे (४.६ बिलियन डॉलर)चे अनुदान दिले जाते. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. गेल्या वर्षी १ डॉलरला ४३ रुपये, असा विनियम दर होता.
आता ५० रुपये आहे. त्यामुळे १ पौंड रुईचा भाव ८२ सेंट म्हणजे १ किलो रुईचा भाव ९५ रुपये होतो. एक क्विंटल कापसापासून ३४ किलो रुई व ६४ किलो सरकी मिळते. ३४ किलो रुईचे भाव ३२५० रुपये व सरकीचे १००० रुपये असे ४२५० रुपये होतात.
४०० ते ६०० रुपये प्रक्रिया खर्च, व्यापारी नफो हिशेबात घेतल्यास ३६०० ते ३८०० रुपये भाव मिळू शकतील.
या पाश्र्वभूमीवर हमीपेक्षा २० टक्के अधिक दर जाहीर करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, असे आवाहन जावंधिया यांनी केले.