चंद्रपुरात क्लिनिकच्या नावाखाली खासगी हॉस्पिटल्सच्या अवैध इमारती Print

* वर्षांकाठी महापालिकेची लाखो रुपयांची कर हानी
* अशा बांधकामांवर कारवाईची नगरसेवकांची मागणी
चंद्रपूर / प्रतिनिधी
क्लिनिकच्या बांधकामाची परवानगी घेऊन शहरातील निवासी परिसरात डॉक्टरांच्या खासगी हॉस्पिटल्सच्या अवैध इमारती उभारण्यात येत आहेत. महानगरपालिका व जिल्हा शल्यचिकित्सकांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष असून त्यामुळे महापालिकेला वर्षांकाठी लाखो रुपयांच्या कराला मुकावे लागत आहे, तर सर्वसामान्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीपथावर असलेल्या या जिल्ह्य़ाला जल, वायू व औद्योगिक प्रदूषणाने ग्रासले आहे. त्यामुळे या शहरात त्वचा, नाक, कान, घसा, डोळे, केस गळती, पोटाचे विकार, मूळव्याध, ह्रदयविकार व श्वसन विकाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. ही संख्या अधिक असल्याने लोकसंख्येच्या तुलनेत विदर्भात सर्वाधिक डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व क्लिनिक चंद्रपूर शहरात आहे. डॉक्टरांची संख्या अधिक असल्याने क्लिनिक व हॉस्पिटल्सची संख्याही वाढत आहे, मात्र यातील बहुतांश हॉस्पिटलचे बांधकाम अवैध असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील निवासी परिसरात हॉस्पिटलचे बांधकाम करू नये, असा महानगरपालिकेचा नियम आहे, परंतु डॉक्टरांच्या वतीने या नियमाला अक्षरश: पायाखाली तुडवण्यात येऊन हॉस्पिटलच्या बहुमजली इमारती बांधण्याची जणू स्पर्धाच येथे सुरू झालेली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या संगनमतानेच हॉस्पिटल्सच्या अवैध इमारती येथे उभ्या राहात आहेत.
जटपुरा गेट येथे नव्याने हॉस्पिटलची इमारत बांधण्यात येत आहे. यासोबतच जयंत टॉकीजच्या मागे, बाजार वॉर्ड, शास्त्रीनगर, नागपूर व मूल मार्गावर शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरांच्या वतीने हॉस्पिटल्स बांधण्यात येत आहेत. या सर्व हॉस्पिटल्सच्या बांधकामांसाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवानगी घेतांना क्लिनिक बांधकामाचा नकाशा सादर करण्यात आलेला आहे. क्लिनिक हे केवळ दोन रुमचे असते. याउलट हॉस्पिटलमध्ये ३० ते ४० रुम्स असतात. एकदा क्लिनिक बांधकामाचा नकाचा मंजूर झाला की, त्यानंतर बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येते. कस्तुरबा व महात्मा गांधी मार्गावर तर अशा अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. पालिकेचा क्लिनिकसाठी लागणारा कर कमी, तर हॉस्पिटलसाठीचा कर अधिक आहे. त्यामुळे पालिकेला लाखो रुपयांच्या कराला सुध्दा मुकावे लागत आहे.
निवासी भागात हॉस्पिटल बांधले तर स्थानिक लोकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. बहुतांश हॉस्पिटलच्या इमारतींमध्ये वाहनतळ, अग्निशमन सेवा नाही. अशाही स्थितीत या अवैध इमारतींचे नकाशे अवघ्या काही दिवसात मंजूर करण्यात येतात. डॉक्टरांच्या दवाखान्यांमुळे निवासी भागातील लोकांना दरुगधी,  गर्दी याचाही त्रास सहन करावा लागतो. पालिकेने अग्निशमन ऑडिटचे काम खासगी संस्थेला सोपविले आहे. या संस्थांनी गल्लीबोळीतील हॉस्पिटलला अग्निशमन दलाची गाडी जाऊ शकत नसतांनाही सुविधा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहेत. आजच्या स्थितीत शहरात किमान १५ खाटांची व्यवस्था असलेले किमान ४० हॉस्पिटल्स आहेत. १५ हॉस्पिटल्सच्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. ही सारी कामे अशाच अवैध पध्दतीने सुरू आहे. नर्सिग होमचे बांधकामही क्लिनिकचा नकाशा मंजूर करून करण्यात येत आहे. या शहरात किमान ५० स्त्री रोगतज्ज्ञ आहेत. या सर्व स्त्री रोगतज्ज्ञांचे स्वतंत्र हॉस्पिटल्स आहेत. त्या सर्व इमारती निवासी परिसरात असून वाहनतळापासून कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
महापालिकेच्या काही अभ्यासू नगरसेवकांनी क्लिनिकच्या नावावर हॉस्पिटलची इमारत बांधणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने यांना विचारणा केली असता नागपूरला बैठकीत असल्याचे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला.