चंद्रपुरात दुर्गा व शारदोत्सव उत्साहात Print

देवीचा महिमा
चंद्रपूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

नवरात्र उत्सवाला आरंभ झाला असून शहरातील विविध सार्वजनिक मंडळांमार्फत दुर्गा व शारदामातेची स्थापना करण्यात आली. या मंडळातर्फे नऊ दिवस विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शहरातील विविध भागात दुर्गा व शारदामातेची मोठय़ा उत्साहात स्थापना करण्यात आली. शहरात अनेक लहान मोठी दुर्गा व शारदा मंडळे आहेत. संध्याकाळी वाद्यांच्या तालावर देवीची मिरवणूक काढण्यात आली. आज सकाळपासूनच कुंभार मोहल्ल्यात मूर्ती खरेदीकरिता भाविकांची गर्दी दिसून येत होती. विविध रूपातील विविध आकारातील आकर्षक अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली. एक फुटापासून दहा फूट उंचीच्या मूर्ती यंदा पाहायला मिळाल्या. शहरात अनेक लहान-मोठी मंडळे आहेत. त्यातील काही मंडळांना अनेक वर्षांची परंपरा आहे. समाधी वॉर्डातील बालमित्र दुर्गा उत्सव मंडळाला ४५ वर्षांची, दादमहल वॉर्डातील सार्वजनिक दुर्गात्सव मंडळाला ५० वर्षांची, पठाणपुरा जोडदेऊळजवळील श्री संताजी मंडळाला २३ वर्षांची, पठाणपुरा येथील सर्वशक्ती दुर्गाउत्सव मंडळाला ४५ र्वष, विठ्ठल मंदिर वॉर्डातील नवशक्ती शारदोत्सव मंडळाला ४३ र्वष, डीआरसी क्लब येथील दुर्गापूजा उत्सव समितीला २५ र्वष, तर पुगलिया गल्ली बालाजी वॉर्ड येथील जय शिवशक्ती शारदोत्सव मंडळाला २५ वर्षांची परंपरा आहे. कॉंग्रेसचे युवा नेते व प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे यशस्वीपणे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदा हे मंडळ रौप्य महोत्सव साजरा करत आहे. यंदा डीआरसी क्लब येथे दहा फू ट उंच, तर वीस फूट रुंद आकाराची, तर सर्वशक्ती दुगरेत्सव मंडळातर्फे देवीची नऊ रूपे साकारण्यात आली. जय शिवशक्ती मंडळातर्फे कोलकाता येथील महालक्ष्मी देवीच्या स्वरूपातील मूर्ती साकारण्यात आली आहे. या उत्सवादरम्यान अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यात सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद, अखंड रामायण, देवी जागरण यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.