नवरात्रीची धुपन आणि आयुर्वेद Print

राळ
डॉ. माधुरी वाघ
९४२२१०९९९३
आज आधुनिक काळात देवीजवळ कृत्रिम सुगंधी कांडय़ा धूप म्हणून वापरत असले तरी ऊद, राळ हे खरे पूजेत प्रसन्नता आणणारे व वातावरण र्निजतुक करून प्रदूषणमुक्त करणारे खरे धुपन द्रव्य आहेत. राळ ही ‘शाल’ वृक्षापासून मिळणारा गोंद किंवा निर्यास आहे. या शाल वृक्षाला वनस्पतीशास्त्रात शोरिया रोबस्ट म्हणतात. फार पूर्वीपासून देवाजवळ राळ धूप म्हणून जळत असल्याने राळीला देवेष्ट, सर्जरस, यक्षधूप, सूरधूप शालवृक्षाला ‘धूपवृक्ष’ म्हणतात. उत्तर भारतात शालवृक्ष सर्वत्र आढळतात. १५० फूट उंच व १५ फूट रुंद वाढणाऱ्या या झाडाची पाने २५ से.ंमी. पर्यंत लांब असतात. या पानांपासून सुंदर टोप्या व कलात्मक टोपल्या बनवल्या जातात.
या शालवृक्षाच्या सालीला छेद करून राळ जमवतात. ही राळ पारदर्शक सुगंधी व चमकदार असते. फार पूर्वीपासून या राळेपासून मलम बनवला जातो. या राळेचा मलम घरीसुद्धा बनवता येतो. यासाठी तिळाचे तेल १ पाव गरम करून घ्यावे त्यात तेवढीच राळ, मेण टाकावे व १०० ग्रॅम तूप टाकून सतत हलवावे. दोन दिवसात सुंदर मलम तयार होतो. या राळेपासून ‘श्वेतमलम’ ही बनवितात. यासाठी गरम तीळ, तेल व समभाग राळ घेऊन एकत्र करून हलवावे व पूर्ण बुडेल एवढे पाणी घालून सतत हलवावे. पाणी वारंवार बदलवावे. दोन दिवसात जो मलम तयार होतो तो फोड, फुन्सी, पीटिका, भेगा, खाज, खरूज, सोरॉयसिस, पामा, दुद्र, स्फोटात जळल्याचा फोड अशा सर्व त्वचारोगांवरील उत्तम मलम होय. जंतुघ्न, दरुगधीनाशक व अस्थिसंधान कर म्हणूनही या राळेचा उपयोग होतो. शालवृक्षाच्या सालीचा काढा वेदनाशामक म्हणूनही वापरतात. ही साल तुरुट रसाची व थंड असल्याने अतिसार रक्त प्रवाहिका, रक्ताशी व रक्तस्त्रावजन्य पाण्डूत काढा करून देतात. लहान मुलांच्या अतिसारात राळ, साखर व लोण्यात मिसळून देतात, तसेच स्त्रियांच्या श्वेतप्रदर (पांढरे पाणी) व रक्तप्रदरात राळ तुपात तळून नागकेसरात मिसळून देतात.
राळेचा धूप करण्यात सरसूच्या तेलात घोळून कांडय़ा बनवतात. त्या जाळून त्याचा धूप गुदार्श, कानातून, दरुगधी पू येणे, न बसणारी जखम, फोड, मस त्वचारोग यावर धुपन करतात. औषधाशिवाय राळेचे इतरही उपयोग आहेत. जसे स्वर्णकार सोन्याच्या पोकळ मण्यात राळ भरून त्यावर नक्षीकाम करतात. मद्रास भागात शालबियाच्या पिठाचा उपयोग ब्रेड करण्यास करतात. या बियांमध्ये प्रोटीन, कबरेदके व स्निग्धांश असल्याने त्यापासून मिळणारे लोणी स्वयंपाकात वापरतात, तसेच शालवृक्षाचे इमारती लाकूड टिकाऊ व वाळवी न लागणारे असल्याने उपयोगी आहे. अशा परिपूर्ण झाडाच्या राळेने परिसर र्निजतुक होऊन सुगंधाने प्रसन्न होतो. म्हणूनच नवरात्रात त्याचा देवीजवळ धूप करतात.