सागवानासह दोघांना अटक Print

बुलढाणा / प्रतिनिधी
गोंधनखेड शिवारात अवैध रंधा मशीन आणि सागवान लाकडांसह दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्याची कारवाई वनविभागाने केली.
गुम्मी राऊंडमधील गोंधनखेड गावात गेल्या पाच दिवसांपासून अवैध रंधा मशीनवर ओले सागवान लाकडे कटई करीत असल्याची गुप्त माहिती साहाय्यक वनसंरक्षक अ. रा. जवरे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी बुलढाण्याच्या फिरत्या पथकाला ही माहिती देऊन कारवाईसाठी सापळा रचला. दरम्यान, काल दुपारी १२.३०च्या सुमारास जवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बी. ए. डुकरे, ए. ए. गीते, पी. एम. बुट्टे, भुतेकर पाटील, जी. कांबळे, काँ. सुभाष गवई, चालक मोरे यांच्या पथकाने गोंधनखेडमध्ये छापा टाकला. या ठिकाणी आरोपी मनोज भिकाजी राजगुरे आणि मनोहर राजाराम पाथरकर रंधा मशीनवर सागवान लाकडांची कटाई करताना आढळून आले. त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून जय कंपनीची रंधा मशीन, चार नग सागवानची ओली लाकडे, करवत, दोन वाकसे, व्हील पानसुद्धा जप्त करण्यात आले.