‘विविध उपक्रम राबविणे हीच ‘द.सां.’ना आदरांजली’ Print

भंडारा / वार्ताहर
खेडय़ात राहून लिहिणाऱ्या साध्या, सामान्य साहित्यिकांना एक प्रतिष्ठेचे साहित्यिक व्यासपीठ मिळावे, याबाबतच्या प्रामाणिक तळमळीतून लाखनी येथे विदर्भ साहित्य संघ शाखेची स्थापना झाली व द.सां.नी अनेक उपक्रम घेतले. भविष्यात असेच विविध उपक्रम संघाच्या वतीने घेऊन हे कार्य पुढे नेल्यास ही द. सा. बोरकरांना खरी आदरांजली ठरेल, असे मत प्रा. मुकुंद देशपांडे यांनी व्यक्त केले.  लाखनी विदर्भ साहित्य संघ शाखेच्या ३५व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मुकुंद देशपांडे होते. अध्यक्षस्थानी हरिभाऊ मोहतुरे होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंकरदादा गभणे स्मृती चित्रकला स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी मराठी विषयात चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रा. देशपांडे म्हणाले, आज गावागावांत साहित्यिक निर्माण होत आहेत. यातील बरेच जण गुणी असतात, मात्र त्यांना चांगले व्यासपीठ मिळत नाही. अशा वेळी साहित्य संघाच्या शाखांची मोलाची मदत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इ. दा. प्रधान यांनी केले. संचालन बा. रा. निखाडे यांनी केले. आभार योगराज बोरकर यांनी मानले.