स्वाईन फ्लूचा बुलढाण्यात एक बळी? Print

बुलढाणा / प्रतिनिधी
येथील एका खासगी रुग्णालयात देऊळघाटच्या ५० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूसदृश रोगाने मृत्यू झाल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे. मृतमहिलेच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संबंधित रुग्णाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला किंवा नाही, याची निश्चिती प्रयोगशाळेतील चाचणी अहवालानंतरच होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. कसबे यांनी सायंकाळी ‘लोकसत्ता’ला दिली.  येथील एका खासगी रुग्णालयात फुप्फुसाचा आजार असलेल्या राधाबाई देवका शेजोळ या महिलेला दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णावर उपचार केल्यानंतरही त्या औषधोपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. या रुग्णालयाच्या संचालकांना संबंधित महिलेला स्वाईन फ्लू असल्याचा संशय आला. त्यांनी ही माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. कसबे यांना दिली. डॉ. कसबे यांनी संबंधित महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्वाईन फ्लू कक्षात दाखल करण्याचे निर्देश दिले, मात्र संबंधित महिलेचा त्यापूर्वीच मृत्यू झाला. संबंधित महिलेचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला किंवा नाही, याचे निदान पुणे येथील  प्रयोगशाळेच्या अहवालानंतर होणार आहे. या संशयास्पद मृत्यूने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. एखाद्या रुग्णास स्वाईन फ्लू रोगासारखी लक्षणे आढळून आल्यास त्यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष कक्षात भरती करता येईल व त्यावर प्रभावी उपचार करण्यात येतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कसबे यांनी सांगितले. यासंदर्भात पूर्वखबरदारीच्या व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.