अशोक पवार यांच्या ‘पडझड’ला राज्यस्तरीय शब्दवेल पुरस्कार Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
साहित्यिक अशोक पवार यांच्या ‘पडझड’ कादंबरीला लातूरचा शब्दवेल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध साहित्यिक द. ता. भोसले व संपादक शरद कारखानीस यांच्या हस्ते लातूर येथे एका शानदार सोहळ्यात अशोक पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रोख, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे आहे.
अशोक पवार यांना यापूर्वी संस्कृती साहित्य राष्ट्रीय पुरस्कारासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे २५ साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे ‘बिराड’ आत्मकथन प्रसिद्ध असून, इळनमाळ, दरकोस दर मुक्काम व पडझड या कादंबऱ्या साहित्यविश्वात गाजल्या. समीक्षक डॉ. प्रा. अनंता सूर, प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांनी अशोक पवारांच्या पुस्तकावर राज्यातील अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संपादित पुस्तक प्रकाशित केले आहे. पवार यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा घेऊन गुजरातमधील साहित्यिकांनी अशोक पवार विशेषांक प्रसिद्ध केला आहे. प्रा. दिलीप अलोणे यांनी ‘बिराड’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
येत्या जानेवारीपर्यंत अशोक पवारांची दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत. शोषितांच्या व्यथा-वेदना अधोरेखित करण्यासाठी साहित्य निर्मितीला बळ मिळाल्याचे अशोक पवार यांनी सांगितले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.