ऐतिहासिक देवीमंदिरासह सार्वजनिक मंडळेही उत्साहात Print

देवी महिमा
  प्रशांत देशमुख
     वर्धा
गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ात गणेश मंडळांचा उत्साह ओसरून दुर्गा मंडळांची संख्या वाढल्याचे चित्र असून ऐतिहासिक देवीमंदिराच्या नवरात्रोत्सवासोबतच या सार्वजनिक मंडळांचाही उत्सव लोकप्रिय ठरला आहे.
जिल्ह्य़ात या वर्षी ९२० मंडळांनी सार्वजनिक दुर्गादेवीची स्थापना केली आहे. सर्व तालुक्यात नवरात्रीचा जोर असून हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३०० मंडळांतर्फे  नवरात्रीचा जागर सुरू झाला आहे. मंडळाचा नवरात्री उत्सव गर्दी खेचत असतानाच प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांच्या वाटेवर देवीभक्तांची गर्दी उसळत आहे. वर्धा-आर्वी रस्त्यावर महाकाली देवस्थान आहे. भस्मासूराला वर दिल्यानंतर त्याने डोक्यावर हात ठेवल्यावर भस्म करण्याचा प्रयोग प्रथम शिवावरच केला तेव्हा शिवाने पळ काढत याच महाकालीच्या परिसरात आश्रय घेतल्याची आख्यायिका आहे. त्यावेळी सतीने बाणाचे रूप धारण करून शिवाची रक्षा केली. तेव्हापासून हे देवीचे पीठ अस्तित्वात आल्याचे भक्त मानतात. त्यानंतर रुक्मिणीने इच्छित वर मिळावा म्हणून याच ठिकाणी देवीला वर मागितल्याचे सांगितले जाते. रामराज्याभिषेक सोहळा आटोपून परतणाऱ्या वानरसेनेला तहान लागल्यावर याच परिसरात आश्रम स्थापन करून राहणाऱ्या धौम्य ऋषीकडे ही सेना गेली. ऋषीने दिव्यशक्तीने जलकुंभ निर्माण केला. सवार्ंची तहान भागली. हा कुंड आजही अस्तित्वात असून त्यास वानरकुंड म्हणून ओळखला जातो.
शंभर वर्षांंपूर्वी गावातील आदिवासी महिलांचे विळ्याचे पाते गवत कापत असतांना रक्तरंजित झाले. हा एक चमत्कार म्हणून गावातील गोसाव्याने महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. देवीभक्तांचा ओघ वाढू लागला. मंदिराची स्थापना झाली, पण पुढे या ठिकाणी धाम सिंचन प्रकल्प उभा झाल्याने मंदिरास जलसमाधी मिळाली. आजही पाण्याचा भर ओसरला की, मंदिराचे कळस दिसू लागतात, पण प्राचीन मंदिरास जलसमाधी मिळाल्याने गावकऱ्यांच्या मागणीस्तव शासनाने खर्च करून नवे मंदिर उभारले. यासोबतच जय महाकाली सेवा मंडळाची पूर्वीपासूनच त्रिदेवी मंदिरात पूजाअर्चा सुरू आहे. दक्षिणेकडील वैष्णोदेवी म्हणून भक्तांमध्ये या मंदिराबाबत श्रद्धा आहे. घटस्थापना व महाप्रसादासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिली. पौराणिक, प्राचीन व ऐतिहासिक संदर्भ या मंदिरास आहेत. अत्यंत मोठा असा वारसा या देवीपीठाला लाभला आहे. त्यामुळे पिढय़ान्पिढय़ांपासून या देवीची आराधना परिसरात होते. सातपुडा पर्वतरांगेतील निसर्गरम्य जंगलात मंदिर वसले असून खरांगण्यापासून त्या ठिकाणी रस्ता जातो. नवरात्र उत्सवात विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांतील देवीभक्तांची या ठिकाणी वाट वळते.  कारंजा तालुक्यात ठाणेगाव येथे हेमाडपंथी शैलीचे देवीमंदिर आहे. नवरात्रीच्या काळात मोठा उत्सव भरतो. ग्रामीण भागातील भक्तांसाठी हे एक जवळचे देवीपीठ ठरले आहे. आर्वीलगत अहिरवाडा येथील देवीच्या मंदिराला पौराणिक संदर्भ आहे. भीमक राजकन्या रुक्मिणीचे अपहरण करण्यास आलेल्या श्रीकृष्णाचा मुक्काम या अहिरवाडा गावात त्यावेळी होता. गावकऱ्यांनी श्रीकृष्णास त्यावेळी आहेर केला. तेव्हापासून गावाचे नाव अहिरवाडा असे पडल्याचे सांगितले जाते. मंदिर आजही चांगल्या अवस्थेत असून मोठे सभागृह आहे. घटस्थापना, भंडारा, पूजाअर्चा, महाप्रसाद असे कार्यक्रम या काळात होतात. पौराणिक आख्यायिकेमुळे दूरवरचे देवीभक्त या ठिकाणी गर्दी करतात.