रासायनिक खतनियंत्रण प्रणाली प्रकल्पासाठी राज्यातून वर्धा जिल्ह्य़ाची निवड Print

वर्धा / प्रतिनिधी
राष्ट्रीय पातळीवर दहा जिल्ह्य़ांत रासायनिक खतनियंत्रण प्रणाली हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी महाराष्ट्रातून वर्धा जिल्ह्य़ाची निवड या प्रकल्पाअंतर्गत झाली आहे.
या योजनेमुळे रासायनिक खतांसाठी दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बंॅक खात्यावर आता जमा होणार आहे. घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनाही आता थेट अनुदान प्राप्त होईल. यासाठी जिल्ह्य़ातील सर्व कृषी केंद्रधारकांना अपेक्षित खतांची माहिती एमएफ एमएस या संकेतस्थळावर भरायची आहे. ही पूर्णत: संगणकीकृत योजना आहे. जिल्ह्य़ात उपलब्ध होणाऱ्या खतांची माहिती यामुळे सर्वाना उपलब्ध असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
या पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्य़ात आजपासून अंमलबजावणीही सुरू झाली असून जिल्ह्य़ातील प्रत्येक कृषी केंद्रधारकांची नोंदणी करून त्यांना त्यांचा पासवर्ड देण्यात आला आहे. केरोसिन व गॅसला मिळणारे शासनाचे अनुदानही लाभार्थीच्या बॅंक खात्यात जमा होईल. खतांसाठी आरसीएफ  ही केंद्रशासनाची कंपनी जिल्ह्य़ात नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. शेतकऱ्यांना मिळणारे किसान क्रेडिट कार्ड आधारकार्डशी संलग्न करीत योजनेचा फोयदा दिला जाईल. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास राष्ट्रीय बंॅकेत खाते काढणे अनिवार्य आहे. असे खाते व आधारकार्ड नसणाऱ्या शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.

विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जे.सी.भुतडा व कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित केले जात असून आरसीएफ चे हेमंत दाभट हे खतवितरण प्रणालीची माहिती देणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनासुद्धा या कार्यक्रमाची माहिती देऊन अवगत केले जाणार आहे. खतांचा तुडवडा, काळाबाजार, निर्धारित किमतीपेक्षा अधिक भावाने विक्री, भेसळ, असे दोष या प्रणालीमुळे दूर होण्याचा विश्वास व्यक्त केला जातो.