विदर्भातील नेत्यांचे सोयीस्कर ‘राजकीय’ मौन चर्चेत Print

गडकरींविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वक्तव्य नाही
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर
 राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आरोपाच्या फैरीत विदर्भातील काँग्रेस व भाजपचे नेते अडकले असले तरी एकमेकांचे विरोधक असलेल्या या राजकीय पक्षाचे स्थानिक नेते या आरोपांचा राजकीय फायदा उठवण्याऐवजी शांत बसले आहेत. या सोयीस्कर मौनाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.  राजकीय वर्तुळात नव्याने दाखल होऊ घातलेल्या अरविंद केजरीवाल व त्यांच्या चमूने सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एकेका राजकीय नेत्याला लक्ष्य करणे सुरू केले आहे. या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत असला तरी त्याचे झटके विदर्भाला सुद्धा बसू लागले आहेत. बुधवारी केजरीवाल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर आरोप केले. आरोपाचा हा बार बऱ्यापैकी फुसका ठरला असला तरी भाजपच्या वर्तुळात कमालीची अस्वस्थता आहे. राजकीय विरोधक या नात्याने या अस्वस्थतेचा फायदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते उचलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षाधारकांचा आता मुखभंग झाला आहे.
राज्यातून राष्ट्रीय राजकारणात गेलेले नितीन गडकरी आता पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. नागपुरातून त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. त्यांचा मुकाबला काँग्रेसचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांच्याशी होईल. या पाश्र्वभूमीवर गडकरींवर शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंबंधीचे आरोप होताच मुत्तेमवार व त्यांचे समर्थक याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी आक्रमक होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मुत्तेमवारांच्या तंबूत कमालीची शांतता आहे.
हाच प्रकार काँग्रेस नेत्यांच्या बाबतीत घडला असता तर भाजपचे नेते तत्परतेने आक्रमक झाले असते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कोणत्याही प्रकारच्या आरोपांचा राजकीय फायदा उठवणे ही राजकीय वर्तुळात नेहमीची बाब मानली जाते. असा फायदा उठवून तात्कालीक लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रकार काही नवा नाही. गडकरींच्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र ही संधी सोडून दिली आहे. काही महिन्यापूर्वी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार विजय दर्डा यांच्यावर कोळसा घोटाळय़ात सहभागी असल्याचा आरोप झाला. सीबीआयने त्यांच्याविरूद्ध गुन्हा सुद्धा नोंदवला. दर्डा यांचे प्रकरण देशभरातील माध्यमात गाजत असताना त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजपच्या वर्तुळातून झाला नाही. दर्डा यांना आणखी अडचणीत आणण्याची संधी भाजपच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे नंतर स्पष्ट झाले. विशेष म्हणजे हा कोळसा घोटाळा भाजपचे विदर्भातील खासदार हंसराज अहीर यांनीच उघडकीस आणला. तेही दर्डा प्रकरणात शांत बसले. राजकीय मतभेद असले तरी दर्डा-गडकरी मैत्री सर्वश्रृत आहे. या मैत्रीखातर भाजपने चुप्पी तर साधली नाही ना? अशी शंका आहे. देशात कोळसा घोटाळा गाजू लागल्यानंतर आंदोलन करू अशी घोषणा भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केली होती. प्रत्यक्षात हे आंदोलन हवेतच विरले. हा घोटाळा उघडकीस आणणारे खासदार हंसराज अहीर यांची भाषणे मात्र पक्षाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा दर्डा यांच्यावरील टिका टाळण्यात आली. दर्डाकडे प्रभावी माध्यम आहे याची जाणीव ठेवून भाजपचे नेते शांत बसले असल्याचा तर्क आता काढला जात आहे. भ्रष्टाचाराचे हे आरोप करणारे अरविंद केजरीवाल यांनी सर्वच राजकीय नेते एकमेकांना सांभाळून घेतात, असा आरोप केला आहे. त्याचा प्रत्यय गडकरी व दर्डा यांच्यावरील आरोपाच्या निमित्ताने विदर्भातील जनतेला आला आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पाळलेले सोयीस्कर मौन केजरीवालांचे म्हणणे खरे ठरवणारे आहे.