झोपडपट्टयांमधील राजकीय दादांचे अवैध धंद्यांना अभय Print

त्रास सर्वसामान्यांनाच पण बोलणार कोण?
संजय राऊत
गोंदिया

गोंदिया जिल्हा भंडारा जिल्ह्य़ातून १९९९ साली स्वतंत्र करण्यात आल्यानंतर या शहराला व लगतच्या परिसरात झोपडपट्टय़ांच्या संख्येत अचानक वाढ झाली. या झोपडपट्टय़ा देशी-विदेशी दारूचे अड्डे, जुगार, वरळी मटका व यातील सर्वात महत्वाचे ठरले ते भंगार विक्रेते. आता तर हे घर खाली करणाऱ्यांसह काही शासकीय तांत्रिक कारणांमुळे अडकलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीत सहकार्य करणाऱ्या दादांच्या पिट्टंचे केंद्र झालेले आहे. गोंदियात गेल्या एका वर्षांत घर खाली करण्यापासून तर प्लॉटिंगच्या क्षुल्लक कारणांवरून शहरातील दोन मोठय़ा राजकीय प्रस्थांची हत्या करण्यात आल्यामुळे या झोपडपट्टय़ांमधील अवैध धंद्यातून झोपडपट्टीत नवनवे दादा उगवले असून आता त्यांचा त्रासामुळे महिला, तरुणी व कमी किंमतीत भाडय़ाचे घर वा स्वमालकीचे घर घेण्याच्या सौद्यातूनही सर्वसामान्यांचा त्रास वाढलेला आहे.                                                                                                     
शहराला लागून असलेल्या या झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात देशी-विदेशी दारूची विक्री होते. शहराच्या मध्यवर्ती भागातातील संजयनगर, गौतमनगर, भीमनगर, लक्ष्मीनगर, हड्डीटोली, जामुनटोली, पकनटोली, बांगलानगर, नगर, न्यु संजय नगर, छोटा गोंदिया येथील होली मोहल्ला, फुलचूरजवळील टोली, सुर्याटोला, सुंदरनगर, सावराटोली, कृष्णपुरा वॉर्ड, झोपडी मोहल्ला, या सर्व झोपडपट्टय़ांमध्ये देशी-विदेशी दारूचे गुत्ते व वरळी मटका, कॅरम बोर्ड क्लॅबच्या आडोशाखाली सुरू असलेले जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक व त्यानंतरचे चंद्रकिशोर मीणा यांनी जिल्ह्य़ात जिल्हा विशेष पोलीस पथकांची स्थापना करून अशा अड्डय़ांसह वरळी मटका व अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली होती व या पोलीस पथकाला झोपडपट्टीतील खबऱ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन अवैध धद्यांवाल्यांवर पोलिसांचा चांगलाच दरारा निर्माण झालेला होता, पण आता हे विशेष पोलीस पथक बरखास्त करण्यात आल्यामुळे पुन्हा झोपडपट्टयांमधील हे अवैध धंदे सुरू झाले आहेत.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या कृष्णपुरा वॉर्डात रोजी रात्री खुलेआम दारूचे गुत्ते अंडय़ांच्या दुकानातून सुरू असतात. नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय आज बहुंतांश नेते याच झोपडपट्टय़ांमधून आलेले आहेत. येथे गोंदिया शहर व रामनगर, अशी दोन पोलीस ठाणी आहेत, तर स्थानिक गुन्हे शाखा, काही संवेदनशील भागात पोलीस चौकी देण्यात आलेली आहे. या चौक्या बरेचदा बंदच असलचे दिसते. विशेष पोलीस पथक संपुष्टात आल्यानंतर शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचे पाहिजे तसे नियंत्रण राहिलेले नसल्याने झोपडपट्टय़ांमदून राजकारणी झालेल्या दादांची दहशत सातत्याने वाढत आहे. या गुंडांना वठणीवर आणले नाही तर  गोंदियातही ‘अक्कू’ कांड होण्यास वेळ लागणार नाही.
गोंदिया शहर आणि शहरालगत घोषित झोपडपट्टय़ांची संख्या ५, तर अघोषित झोपडपट्टय़ांची संख्या १३ आहे. बऱ्याच झोपडपट्टय़ा अतिक्रमण करून  थाटलेल्या आहेत, पण या झोपडपट्टय़ा नगरसेवकांच्या व्होटबँक असल्यामुळे त्यांना उद्धवस्त करण्याचे वा हटविण्याचे प्रयत्न प्रशासनाने कधीच केलेले नाही. आता राजकारणी म्हणून मिरविणाऱ्या दादांकडे अशा झोपडपट्टीतील पन्नास ते शंभर मुलांची टोळी सतत काम करत असते. ही टोळी या दादांच्या एका फोनवर एकत्र येऊन कोणतेही कृत्य करतात. त्यामुळे आपल्या टोळीतील मुलांना पोलिसाच्या ताब्यातून सोडविणे, त्यांना जामीन मिळवून देणे, त्यांच्या केसेस लढवून त्यांना बाहेर आणणे, अशी सर्व कामे हे दादा करतात. गोंदियातील २५ टक्के भाग झोपडपट्टय़ांचा आहे. या भागात शहराच्या लोकसंख्येच्या सुमारे ३० ते ३५ टक्के लोक राहतात. या भागातील गुन्हेगारीवर झोपडपट्टी दादांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना आवरण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरलेली आहे. या सर्व परिस्थितीचा सर्वाधिक त्रास हा शहरातील, तसेच झोपडपट्टीतील सर्वसामान्यांनाही होत आहे. यावर पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्यास शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होईल.