कोळशाअभावी ‘बत्ती गुल’ Print

दसरा-दिवाळीत अंधाराचे साम्राज्य?
सचिन देशपांडे
अकोला, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

अपुऱ्या कोळसा पुरवठय़ाने राज्यातील महानिर्मितीच्या वीज निर्मिती केंद्रांना जबरदस्त तडाखा बसत असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन संच हे वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी तर, दोन संच बॉयलर टय़ूब लीकच्या कारणाने बंद पडले आहेत. कोळसा पुरवठा अनियमित असल्याने राज्य अंधाराच्या वाटेवर आहे. नाशिक वगळता राज्यातील सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळशाचा स्टॉक हा केवळ एक दोन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. राज्याच्या मागणीपेक्षा पाच हजार मेगाव्ॉट विजेची तूट निर्माण झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे ऐन दसरा-दिवाळीत वीज टंचाईचे संकट घोंघावू लागले आहे.
आयात कोळशामध्ये उष्मांकाची पातळी उच्च राहते. नेमका याच कोळशाच्या पुरवठय़ावर राज्यभरात विपरित परिणाम झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे स्थानिक कोळशाचा वापर करत राज्यातील वीज निर्मिती होत आहे.
राज्यात नव्याने स्थापित झालेल्या वीज केंद्रात अधिक उष्मांक असलेला कोळसा आवश्यक आहे. देशातील व्यापाऱ्यांच्या विदेशात असलेल्या कोळसा खाणीची लीज संपल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. येत्या काही दिवसात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    
राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रातून ४,१८२ मेगाव्ॉट, उरण येथील गॅसवर आधारित प्रकल्पातून ४०२ मेगाव्ॉट, जल विद्युत केंद्रातून ८२४ मेगाव्ॉट विजेची निर्मिती होत आहे. महानिर्मिती व इतर वीज निर्मिती केद्रातून सुमारे राज्यात सुमारे ९,८२७ मेगाव्ॉट वीज निर्मिती होत आहे. त्याच वेळेस राज्यातील विजेची मागणी ही १५ हजार मेगाव्ॉट इतकी आहे. काही वीज निर्मिती केंद्रात स्थापित क्षमतेपेक्षा कमी उत्पादन होत आहे. त्यामुळे राज्यातील वीज भारनियमनात सतत वाढते आहे. शून्य तूट असलेल्या ठिकाणीदेखील भारनियमन होत असल्याने नागरिकांची ओरड आहे. अकस्मात भारनियमनाचा फटका ग्रामीण भागात अधिक बसल्याने जनता त्रस्त आहे.
नवरात्रोत्सवात भारनियमन होणार नाही ही घोषणा काही ठिकाणी फसवी ठरली. राज्यातील महानिर्मिती आणि इतर कंपन्यांमधून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या धोरणांची व निर्णयांची सरकारने स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा अधिकाऱ्यांच्या फसव्या धोरणांमुळे व वेळेवर कंत्राट न दिल्याने राज्यातील जनतेला हिवाळ्यात भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहे.
राज्यात केवळ नाशिक येथे असलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळश्यांचा पुरेसा साठा आहे. पण, तेथील ही एक संच नादुरुस्तीमुळे बंद आहे. कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संचासाठी आवश्यक कोळसा सात दिवस पुरेल इतका देखील नाही. तसेच पारस वगळता या सर्व केंद्रातील एक-एक संच बंद असल्याची माहिती मिळाली. सात दिवसांपेक्षा कमी दिवस पुरेल एवढाच कोळसा प्रकल्पात असल्याने या प्रकल्पांची परिस्थिती चिंताजनक आहे.