५९ कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार Print

भंडारा / वार्ताहर
जिल्ह्य़ातील गुन्ह्य़ांच्या तपासात विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केला. बँकेतून ५ लाख रुपयांची रक्कम नेताना अज्ञात इसमांनी पैशाची बॅग पळविली. या डॉ.अनिल म्हस्के यांच्या खोटय़ा तक्रारीचे बिंग फोडणारे व रक्कम हस्तगत करणारे गुन्हेशाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे व त्यांच्या पथकाचा, चोरीच्या १७ सायकल जप्त करून तीन आरोपींना अटक करणारे भंडारा येथील पोलीस निरीक्षक वसंत पडोळे व चमू, तसेच सहा गुन्ह्य़ात हवा असलेला शेरू चिंधालोरे याला पकडणारे तुमसरचे पोलीस निरीक्षक नरूमणी तांडी व त्यांचे सहकारी यांचा आणि अडय़ाळ पोलीस ठाण्याअंतर्गत अवैधरीत्या रेशनचे तांदूळ व गहू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणारे व गोलेवाडी खून खटल्याचा योग्य तपास करून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा मिळेल इतके पुरावे जमा करणारे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी, अशा १५ अधिकारी व ४४ कर्मचारी या बक्षीस व सत्कार सोहळ्याचे मानकरी ठरले.