मराठा साहित्य संमेलनासाठी चंद्रपूर नगरी सज्ज Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
चंद्रपूरला होऊ घातलेल्या नवव्या मराठा साहित्य संमेलनासाठी चंद्रपूर नगरी सज्ज झाली आहे. येत्या २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान चांदा क्लब ग्राऊंड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित संमेलनात साहित्य नगरी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. दहा हजार व्यक्तींची बसण्याची व्यवस्था असलेला सभामंडप, चार हजार लोकांची निवास व्यवस्था शंभर रूपयांच्या मोफत दरात करण्यात आली आहे. ग्रंथप्रदर्शन, भोजनव्यवस्था असलेला हा साहित्य परिसर उभारला जात आहे, अशी माहिती जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रा. अशोक राणा यांनी पत्रपरिषदेत दिली.
संताजी जगनाडे महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची नावे प्रवेशद्वारांना देण्यात आली आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले आहे. साहित्य परिसरातील विचारपिठाला समाजप्रबोधक संत गाडगेबाबा यांचे नाव दिले. स्मृतीशेष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांचे नाव मुख्य सभामंडपाला दिले आहे. मराठा सेवा संघाचे दीपस्तंभ स्मृतिशेष पंढरीनाथ सोनटक्के यांचे नाव चित्रप्रदर्शनाला दिले आहे. २६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सोहळय़ाची सुरूवात आदल्यादिवशीच होणार आहे.
चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हय़ातून एकूण चार ग्रंथदिंडय़ा २५ ऑक्टोबर रोजी चंद्रपूरकरिता प्रस्थान करणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. उद्घाटन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ७ वाजता बाल कवी संमेलन आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती मसाडे राहतील. २७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन समारंभ होईल. संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध लेखक तथा प्रकाशक बाबा भांड आहेत. यानंतर महापरिसंवाद, परिसंवाद हे कार्यक्रम होतील. २८ ऑक्टोबर रोजीही अनेक विषयांवरील परिसंवाद होणार आहे. पाच वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. पत्रकार परिषदेला प्रा. दिलीप चौधरी, पुष्पा बोंडे, प्रभाकर पाल, विनोद थेरे,   प्रा. एन. के. लिंगे,   लता होरे उपस्थित होते.