‘सबका मालिक’ महानाटय़ाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Print

परभणी/वार्ताहर
‘परभणी फेस्टिव्हल’ निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर ‘सबका मालिक एक’ महानाटय़ाने कळस चढविला. महानाटय़ास परभणीकर रसिकांनी स्टेडियम मैदानावर मोठी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित परभणी फेस्टिव्हलनिमित्ताने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. स्थानिक कलावंतांच्या सादरीकरणासह ऑर्केस्ट्रा, लावणी, नाटक, मुशायरा अशा कार्यक्रमांना रसिकांनी मोठी उपस्थिती लावली. केवळ महिलांसाठी ‘पती सारे उचापती’ नाटकाचा प्रयोग झाला.
सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध क्रीडा स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले. महिलांसाठी आयोजित स्पर्धानाही मोठा प्रतिसाद मिळाला. साईबाबांच्या जीवनावर आधारित महानाटय़ाने गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला.
स्टेडियम मैदानावर झालेल्या महानाटय़ासाठी भव्य व्यासपीठ उभारले होते. साई क्रिएटिव्ह व्हिजननिर्मित ‘सबका मालिक एक है’ महानाटय़ाचा प्रयोग रविवारी रात्री पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिर्डी अवतरल्याचा भास उपस्थितांना झाला. महापौर प्रताप देशमुख यांनी साईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नाटय़ास प्रारंभ झाला. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग महानाटय़ात सादर करण्यात आले. तब्बल सव्वाशे कलावंतांचा संच असलेल्या महानाटय़ात अनिल पालकर यांनी साईबाबांची भूमिका साकारताना साक्षात साईबाबांचे दर्शन रसिकांना घडले. पालकर यांच्या या भूमिकेसाठी सुधीर दळवी यांचा आवाज लाभला. या आवाजाने साईबाबांची व्यक्तिरेखा प्रभाव टाकणारी ठरली.
‘नमो नमो साई’, ‘बाबा के संग संग चलो रे’, ‘साई शिर्डीनगर में आये हैं’ या गीतांचे कलावंतांनी नृत्यासह सादरीकरण केले. सहा हजार चौरस फुटांचा रंगमंच, नेत्रदीपक प्रकाशयोजना, परिणामकारक ध्वनिसंयोजन व महानाटय़ातील सर्वच कलावंतांचा लक्षणीय अभिनय यामुळे हे महानाटय़ रसिकांच्या काळाचा ठाव घेणारे ठरले. साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग महानाटय़ात हुबेहूब साकारण्यात आले. रसिकांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली.
महानाटय़ाचे लेखन देवेंद्र दोडके यांनी केले, तर निर्मिती व दिग्दर्शन सोमेश्वर बालपांडे यांनी केले. संकल्पना देवेंद्र वेलणकर यांची तर प्रशांत डांगे समन्वयक होते.