ट्रेन्ड पॅक कंपनीचे उत्पादन अचानक बंद ; ऐन दिवाळीत कामगारांवर बेकारीचे संकट, निदर्शने Print

बुलढाणा/प्रतिनिधी
खामगाव येथील एमआयडीसीतील ट्रेन्ड पॅक कंपनीने कालपासून आपले उत्पादन अचानक बंद केले. त्यामुळे कामगारांनी गेटसमोर घोषणाबाजी व निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला. कंपनी अचानक बंद झाल्याने कामगारांवर ऐन दसरा-दिवाळीत बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
एमआयडीसीतील प्लॉट नं.सी-३ मध्ये ट्रेन्ड पॅक ही कंपनी सुरू होती. या कंपनीतील सकाळच्या पाळीतील ३१ कामगार काल सकाळी ७ वाजता कामावर गेले असता त्यांना गेट बंद दिसले. गेट बंद का आहे, अशी विचारणा कामगारांनी गेटमनला केली असता फॅक्टरी मॅनेजर किरण गुप्ते यांच्या आदेशाने कंपनीचे काम कालपासून बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कामगार संतप्त झाले. त्यांनी गेटसमोरच घोषणाबाजी व निदर्शने करून निषेध व्यक्त केला.  विशेष म्हणजे, या कंपनीने या अगोदर सुध्दा २० ऑगस्ट २०१२ रोजी उत्पादन बंद केले होते, पण कामगारांनी त्या विरोधात कामगार न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने उत्पादन बंदच्या आदेशाला स्थगितीचा आदेश ३१ ऑगस्टला दिला होता. त्यामुळे उत्पादन पूर्ववत सुरू करण्यात आले, पण आज पुन्हा तोच प्रकार घडला.
पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आल्याने कामगारांवर संकट ओढवले आहे. यासंदर्भात व्यवस्थापक किरण गुप्ते यांना विचारणा केली असता कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश मालकांनी दिल्याने कामगारांना कमी केल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. ट्रेन्ड पॅक कंपनींतर्गत मॅग्ना पॅक कंपनीचे उत्पादन मात्र सुरू असून यात उडिसा येथील कंत्राटदार प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली ४०-४५ परप्रांतीय कामगार आहेत. स्थानिक कामगार हे १६ वर्षांपासून काम करत असतांना व मस्टरकार्ड, परमनन्ट ऑर्डर, पगार स्लीप वगरे असतांनाही त्यांना मात्र अचानक कमी करण्यात आले.