नागपुरात १२६ मोतीबिंदू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया Print

यवतमाळ/वार्ताहर
alt

यवतमाळ जिल्ह्य़ातील घाटंजी तालुक्यातील नेत्ररोगग्रस्त रुग्णांची नेत्र तपासणी करून आवश्यक असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान करण्याचा अत्यंत मानवतावादी प्रकल्प नागपूरच्या डॉ. महात्मे नेत्रपेढी व रुग्णालय, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सत्य साई बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था दत्तापूर आणि मोवाडा गट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
 मोवाडा येथील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रकिया शिबिरात ३४७ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १२६ रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले. उल्लेखनीय म्हणजे, या सर्व रुग्णांवर नागपूरच्या महात्मे नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळ्यांचे गंभीर आजार असणारे २३ रुग्ण आढळले असून त्यात बालकांचाही समावेश आहे, त्यावरही उपचार केले जातील, असे आयोजकांनी सांगितले.
शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवानंद पवार यांच्या हस्ते झाले. डोळेही सजीव सृष्टीला मिळालेली अमूल्य देणगी आहे. समाजातील डोळसपणा हा केवळ सुंदर जग पाहण्यासाठी नाही, तर स्वंयपूर्ण जगण्यासाठी गरजेचा आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रेरणेने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण घाटंजी तालुका नेत्ररोगमुक्त करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रूपेश कलमवार, राजेश निकोडे इत्यादी उपस्थित होते. महात्मे नेत्र रुग्णालाचे डॉ. मोहन खराबे, डॉ. एन.डी. झाडे, डॉ.अरिवद डोंगरवार, डॉ. मोहन गेडाम यांनी रुग्णांची तपासणी केली.