बिग बी च्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप Print

चंद्रपूर/प्रतिनिधी
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंदू पाठक, डॉ.शरदचंद्र सालफळे, विश्वास लहामगे, प्रा.जयश्री कापसे गावंडे.

महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत चंदू पाठक यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने मूकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ, बुक व पेनचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.शरदचंद्र सालफळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मूकबधिर विद्यालयाचे संचालक विश्वास लहामगे, नाटय़कर्मी प्रा. जयश्री कापसे गावंडे, वीणा पाठक उपस्थित होत्या. याच समारोहात चंदू पाठक यांनी मूबबधिर विद्यालयाला सिंटेक्स टाकी भेट स्वरूपात दिली. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. याप्रसंगी सरोज मंगरूळकर यांनी कर पल्लवी व्दारा विद्यार्थ्यांना भाषणातील आशय समजावून सांगितला. कांता कोचे यांनी यावेळी स्वागतगीत सादर केले, तर सर्वश्री किशोर करपे, मधुकर जथाडे, अजय वैरागडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन आशीष देव यांनी केले.
याच दिवशी सायंकाळी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आठवणीतील अभिताभ बच्चन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चंदू पाठक यांनी विविध अनुभवांच्या आधारे अमिताभसोबतचे ऋणानुबंध उलगडवून दाखविले. एलसीडी प्रोजेक्टरवर चंदू पाठक आणि अमिताभ यांच्या भेटीची दृष्ये दाखविण्यात आली. पाठक यांनी काढलेल्या अमिताभच्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी लावण्यात आले होते. पाठक यांनी लिहिलेली  ‘मी अनुभवलेला अमिताभ’ व ‘दिव्यत्वाची प्रचिती' ही दोन पुस्तकेही यावेळी उपलब्ध होती. याप्रसंगी प्रा. कापसे-गावंडे यांनी चित्रांच्या माध्यमातून पाठक यांनी अमिताभच्या मनात घर केल्याचे सांगितले. लहामगे यांनी पाठक व अमिताभ यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ.सालफळे यांनी लिखित स्वरूपातील शुभेच्छा पाठकांना दिल्या. याप्रसंगी सर्वश्री राजा बोझावार, उमाकांत धांडे, मधुकर वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावरील साऱ्यांची भाषणे झाली. प्रफुल्ल जेकब, नरेश रामटेके, शेष देवूरमल्ले, विजय येनकर, वैशाली गेडाम, दीपिका दोमकुंडवार यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.