माहूरची रेणुका व केळापूरच्या जगदंबेसाठी भाविकांची गर्दी Print

देवीचा महिमा
यवतमाळ / वार्ताहर
माहुरची रेणुका देवी

दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात आणि केळापूरच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाळपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची या निर्सगरम्य परिसरात प्रचंड गर्दी उसळलेली आहे.
माहूर येथे बाबा सोनापीरचा प्राचीन दर्गा सुध्दा आहे. शिवाय, पांडव लेणी आणि शेखफरीद दरगाह यासाठी सुध्दा माहूरगड प्रसिध्द आहे. हजारो भाविकांची रेणुकेच्या दर्शनासाठी गर्दी होत असल्याने आणि देवीच्या साडेतीन पीठांपकी एक पूर्ण पीठ माहूरची रेणुका असल्याने भक्तांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात होत आहे.
त्यामुळे भौतिक सोई-सुविधांची पुर्तता करणे मंदिर व्यवस्थापनाला कठीण जात आहे. विशेषत: पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. माहूरच्या विकासासाठी एक विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास ८० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे.
केळापूरच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी विदर्भ-मराठवाडय़ातून नव्हे, तर आंधप्रदेशातूनही हजारो भाविक जगदंबेच्या दर्शनासाठी येत आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी दुर्गोत्सवाची मोठय़ा प्रमाणात धामधुम सुरू असुन यवतमाळात तर चौकाचौकात प्रचंड सभा मंडप उभारून देवीची स्थापना करण्यात आली आहे.