नवरात्रीतील धुपन आणि आयुर्वेद सर्ज Print

डॉ. माधुरी वाघ - ९४२२१०९९९३
alt

ज्यावनस्पतीच्या नावाचा अर्थच ज्यातून गोंद निघतो असा होतो, अशी सर्ज वनस्पती म्हणजे वनस्पतीशास्त्रातील व्हेटेरिओ होय. याचा मोठा वृक्ष असतो. याच्या खोडातून चिरले किंवा कापले असता जखम भरून येण्यासाठी पांढरा स्त्राव स्त्रवतो. हा सुगंधी गोंद धुपनासाठी वापरतात. त्याला श्वेतरंगामुळे चन्द्रस किंवा पांढरे डांबर म्हणतात. दक्षिण-पश्चिम भारतात ही विशेष आढळणारी वनस्पती आहे. याचे फळ लंबगोलाकार, मांसल व तीन भाग युक्त असते. प्रत्येक भागात एक बी असते. या बियांमधून ५० टक्के सुगंधी, हिरवट पिवळे असे तेल मिळते. ते थंडीत गोठते. त्यात ओलीव असिड व वसाम्ल असते. या तेलाने  अंगाला मालिश करतात. एखाद्या अवयवातील कार्यशक्ती कमी झाल्यास किंवा स्पर्शज्ञान कमी होत असल्यास स्नेहन व उत्तेजक असल्याने हे तेल चोळल्याने फायदा होतो. तसेच जीर्ण आमवातात लहान-मोठय़ा सांध्यांवर सूज असताना, सांध्यांची हालचाल वेदनायुक्त असताना, कंबर, गुडघे असे सांधे अकडले असतांना सर्ज तेलाच्या लेपनाने वेदनाहरण असल्याने रुग्णास आराम वाटतो.
या सर्ज वृक्षातून निघणारा सर्जरस राळेसारखा अग्नीवर जळतो. हा धुप सुगंधी व कृमीनाशक असतो. वेदनायुक्त भागावर याची साल उगाळून लावतात किंवा राळ तेलात शिजवून लेप लावतात. हा लेप सुगंधी व जंतुनाशक असल्याने जुने फोड, स्त्रावयुक्त पिटिका, गजकर्ण, खाज येऊन त्वचा काळी होणे, दद्रु, मंडळ कुष्ठ, खरूज अशा त्वचारोगावर लेप लावतात. हा लेप नियमित लावल्यास त्वचारोगासाठी हितकारक आहे. ही राळ तुरट रसाची थंड असल्याने आघाताने होणाऱ्या जखमेवर रक्त थांबविण्यास लावतात. जखम लवकर भरून येते. या सर्जरस राळेचा धूर सुगंधी कृमिनाशक असल्याने, तसेच फुफ्फुसातील कफ सहज निघण्यास उपयोगी असल्याने सर्दी खोकल्यात धुप घेतात. वारंवार होणाऱ्या मुत्रगर्भातील संसर्गात, मुत्रदाह असताना सर्जरस जिरे-साखरे बरोबर देतात. स्त्रियांच्या श्वेतप्रदरातही योनी घावनासाठी जन्तुघ्न म्हणून उपयोगी आहे. अति घाण येणाऱ्यांनी सुगंधी सर्जराळेने धुपन घ्यावे. राळेप्रमाणेच तिळाच्या तेलात मिसळून सर्जरसापासून मलम तयार होतो. त्या सर्जरसादी मलम दग्दव्रणावर आग कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. म्हणूनच सर्जरस देवीच्या पुजेत लावण्यात येणाऱ्या धुपन द्रव्यातील एक घटक आहे. त्याचा उपयोग पर्यावरण शुध्दीसाठी करायलाच हवा.