गोंदिया जिल्ह्य़ात वीज दरवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी उद्योग बंद आंदोलन Print

गोंदिया / वार्ताहर
alt

राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या वीज दरवाढीमुळे संकटात आलेल्या लघुउद्योजकांनी येत्या २५ ऑक्टोबरला संपूर्ण उद्योग बंद ठेवून वीज दरवाढीच्या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने घेतलेल्या या निर्णयाला विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देताना राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल आणि सचिव अशोक सी.अग्रवाल यांनी सांगितले की, राज्यात २०११-१२ मध्ये वीज दरात यावेळी नवव्यांदा आणि मोठी वाढ करण्यात आली आहे.
आता केलेल्या दरवाढीत युनिटमागे १.६१ रुपये आणि ३० टक्के केव्हीए शुल्क वाढविण्यात आले. लघुउद्योगांसाठी ही वाढ कंबरडे मोडणारी आहे. राज्य सरकारच्या निष्क्रिय औद्योगिक नितीमुळे उद्योग संकटात येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांना दिल्या जाणाऱ्या विजेचा दर जास्त आहे. यापूर्वी केलेली दरवाढ नगण्य स्वरूपात असल्यामुळे आम्ही ती सहन केली, मात्र आता केलेली दरवाढ लघुउद्योगांचे कंबरडे मोडणारी आहे.
सरकारच्या या धोरणामुळेच राज्यात नवीन उद्योग येणे बंद झाले आहे. ही वीज दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास राज्य उद्योगमुक्त होईल, असा इशाराही यावेळी राईस मिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
वीज दरवाढीला विरोध करण्यासाठी २५ ऑक्टोबरच्या बंदमध्ये राईस मिलर्सशिवाय एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीयल असोसिएशन, ऑईल मिल, दळणयंत्र (चक्की), लाख असोसिएशन, प्लास्टिक असोसिएशन आदी संघटनांचे सदस्य उद्योग बंद ठेवणार आहेत. यानंतरही सरकारने वीज दरवाढ मागे न घेतल्यास सर्व उद्योग एकजुटीने मोठे आंदोलन करून वीज बिलांचा निषेध करतील, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला राईस मिलस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दामोधर अग्रवाल, माजी अध्यक्ष अशोक अग्रवाल (पी.ए.), दिनेश दादरीवाल, सुमित भालोटिया, वेदप्रकाश गोयल, प्रल्हाद भटेजा आदी पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते. विशेष म्हणजे, सततच्या वीज दरवाढीचा फटका केवळ उद्योगांनाच नाही, तर सामान्य ग्राहकांनाही बसत आहे. त्यामुळे या बंदमध्ये सामान्य वीज ग्राहकांनीही सहभागी होऊन उद्योजकांना सहकार्य द्यावे, असेही आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.