सोयाबीनने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी Print

उत्पादन खर्च, मजुरीचे वाढते  दर आणि पडलेले भाव
सोमनाथ सावळे , बुलढाणा
alt

नगदीचे खरीप पिक सोयाबीनच्या काढणी मळणी हंगामाला जिल्हयात सर्वत्र जोरात प्रारंभ झाला असून सोयाबीनच्या उताऱ्यात झालेली अर्धी अधिक घट, मजूरांची चणचण, मजुरीचे वाढलेले भाव, मळणीयंत्राचे व वाहतूकीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिक उत्पादनाच्या वाढत्या खर्चाचा सामना तो करीत असतांना सोयाबीनचे भाव गडगडल्याने त्याच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.
यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाऊस अवर्षण असतांनाही आपल्या पेरण्या आटोपल्या. अपुऱ्या व अनियमित पावसाचा सामना करीत सोयाबीन पिक तरले. निंदणी खुरपणी ऐवजी शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात महागडया तणनाशकांची फवारणी केली. यावर्षी सोयाबीनवर किडी व अळीचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे त्याला अतिशय महागडी व प्रभावी किटक नाशके फवारावी लागली. सोयाबीन पिकांची सोंगणी करण्यासाठी प्रति एकर दोन हजार रूपयांपेक्षा अधिक मजुरी दर गेला आहे. मळणी यंत्राच्या काढणीचे भाव प्रति पोते शंभर ते एकशे दहा रूपये झाला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च यावर्षी प्रतिएकर चार हजार रूपये गेला असतांना सोयाबीनला केवळ तीन हजार रूपये भाव मिळत आहे. हा आत बट्टयाचा व्यवहार पाहून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल पाच हजार रूपयांवर गेले होते. मात्र शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच सोयाबीनचे भाव अर्धे अधिक पडले. आता दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे असे भाव आहेत. शेतकऱ्यांना गंडविण्याच्या या धोरणामुळे त्यासाठी दुष्काळात तेरावा महिना तयार झाला आहे. केंद्र शासनाने पाम खाद्य तेल व सोयाबीन ढेपीवरील आयात शुल्क रद्द केल्याने सोया प्रक्रिया उद्योग श्ेातकऱ्यांना लुटत आहेत. या एकूणच भावाच्या चढउतारीवर केंद्र व राज्य शासनाचे अजिबात नियंत्रण नाही.  यंदा पाऊस अवर्षण असल्याने रब्बी हंगामात सत्तर टक्क े घट होणार आहे. ही परिस्थिती पाहता सोयाबीन काढणीचे मजुरांचे भाव वाढले आहेत. काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने ते अधिक रोजंदारीवर शहरी व सोयाबीन नसलेल्या पटृयातून आणावे लागत आहे.
शासनाने सोयाबीन उत्पादकांसाठी सोयाबीनचे हमीभाव चार हजार रूपये प्रतिक्विंटल जाहीर करावेत. सोयाबीनची या हमीभावाने राज्यशासन व नाफेडने खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. असे हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या लुटीचे तंत्र थांबवून दोन पैसे त्याच्या खिशात खुळखुळणार आहेत. अन्यथा तो प्रचंड आर्थिक संकटात सापडून आत्महत्येकडे प्रवृत्त होणार असल्याचे दुदैवी चित्र दिसू लागले आहे.