एस.टी.च्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ Print

सेवाकाळ मात्र दोन वर्षांनी कमी होणार
भंडारा/वार्ताहर
alt

एसटी कामगार संघटनेद्वारे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ दोन वर्षांनी कमी करून त्यांना २००० रुपये वेतनवाढ देण्याची तयारी एसटी प्रशासनाने दर्शविली. यामुळे वाढत्या महागाईच्या काळात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.स्टेट ट्रॉन्सपोर्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी १० ऑक्टोबरला विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात कामगारांना फेब्रुवारी व मार्च २०१२ या दोन महिन्यांचा महागाई भत्ता देण्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोर दिला. तसेच एसटी महामंडळात कार्यरत असलेले कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनात काम करणे अशक्य असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.
त्यावर अधिकाऱ्यांनी जुलै २०१० पासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना २००० रुपये वेतनवाढ करण्यास सहमती दर्शविली. या कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ पाच वर्षांवरून तीन वर्षे करण्याबाबत संघटनेच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे एसटीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात थकबाकी व वाढीव वेतनवाढ मिळणार अशी आशा निर्माण झाली आहे.
याशिवाय सतत २४ वर्षे एकाच पदावर अखंड सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन टक्के वेतनवाढ, ओळखपत्राऐवजी स्मार्ट कार्ड देणे, वाहकांना १०० रूपये अग्रधन देणे आदी मागण्यांवर याबैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी, पदोन्नती व निवडश्रेणीसाठी ग्राह्य़ धरणे आदींवर महामंडळ संघटनेसोबत करार करून मागण्या निकाली काढणार आहे.
स्टेट ट्रॉन्सपोर्ट कर्मचारी संघटनद्वारे मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या इतर समस्या व प्रश्नांवर लवकरच निर्णय होईल, अशी आशा निर्माण झाली आहे, असे एसटी कामगार संघटनेचे सुनील पशिने यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी १७ ते १८ सप्टेंबरला राज्यात बेकायदा कामबंद आंदोलन केले होते.यात कर्मचाऱ्यांना कामगार संघटनेच्या विरोधात भडकवून त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले होते,त्यावर एसटी प्रशासनाने हे आंदोलन अवैध ठरवून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येकी ८ ते २४ दिवसांचे वेतन कपात केली यामुळे काही आगारातील असंतुष्ट कर्मचाऱ्यांनी दसऱ्याला सामूहिक रजा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पुन्हा प्रवासी आणि एसटीला नुकसान होण्याची भीती आहे. अशावेळी आंदोलनात सहभागी कामगारांवर प्रशासनाद्वारे पुन्हा कारवाई होण्याची शक्यता आहे.
मात्र, अशा आंदोलनामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असून त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांना सोसावा लागत आहे. तेव्हा कामगारांनी आपली दिशाभूल होऊ देऊ नये व फसवणूक करून घेऊ नये. कामगारांचे प्रश्न वाटाघाटीच्या स्वरूपातून सोडवावे, असे आवाहान एसटी कामगार संघटनेचे सुनील पशिने यांनी केले.