गोंदियातील वैद्यक महाविद्यालयाचा मार्ग मोकळा Print

गोंदिया / वार्ताहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी राज्य शासनातर्फे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २८ सप्टेंबर २०१२ रोजी सरकारतर्फे विशेष पत्र पाठवून गोंदिया जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याचे कळविले होते.  अनेक वर्षांपासून या जिल्ह्य़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी स्थानिक आमदार प्रयत्नशील आहेत, तसेच येथे ४०० खाटांचे के.टी.एस.व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय उपलब्ध असल्याने शासनावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक भरुदड पडणार नसल्याने यासाठी त्यांनी विधानसभेतही मुद्दा मांडला होता.  यासाठी  कोणतेही राजकारण न करता महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही समर्थन देत जिल्ह्य़ातील विधान परिषद सदस्य आमदार राजेंद्र जैन, आमदार रामरतन राऊत, खासदार मारोतराव कोवासे यांनीही पाठिंबा दर्शविला. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दोन्ही पक्षाच्या कोटय़ातून मंजुरी देण्यात यावी.
राज्याच्या शेवटच्या टोकावरील जिल्ह्य़ाला न्याय देण्याची मागणीही या लोकप्रतिनिधींनी केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.