वीज दरवाढीविरुद्ध उद्या औद्योगिक संघटनांचे आंदोलन Print

बुलढाणा/प्रतिनिधी
विजेच्या दरवाढीविरोधात विदर्भातील औद्योगिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या दरवाढीचा निषेध म्हणून २५ ऑक्टोबर रोजी उद्योग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरही दरवाढ मागे न घेतल्यास १ नोव्हेंबरपासून बिल भरणा न करता आंदोलन करण्याचा इशारा खामगाव येथील एमआयडीसी असोसिएशनने दिला आहे.
वीज वितरण कंपनीने चालू महिन्यापासून विजेच्या दरात मोठी वाढ केल्याने याचा भरुदड घरगुती ग्राहकांसह उद्योजकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात विचार करण्यासाठी विदर्भातील सर्व औद्योगिक संघटनांची सभा नागपूरला झाली. या सभेत विजेच्या दरवाढीबाबत चर्चा करण्यात आली. ही दरवाढ अन्यायकारक व उद्योगाला न झेपणारी आहे. अशा परिस्थितीत उद्योग चालू ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे दरवाढ मागे न घेतल्यास राज्यातील औद्योगिकरण थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वीज दरवाढीचा निषेध म्हणून २५ ऑक्टोबर रोजी एमआयडीसीतील उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर ३० ऑक्टोबपर्यंत दरवाढ मागे न घेतल्यास १ नोव्हेंबरपासून वीज बिलाचा भरणा करण्यात येणार नाही व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खामगांव एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनच्या वतीने वीज कंपनीला देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष मोहनलाल टावरी, उपाध्यक्ष जे.पी. तिवारी व सचिव अशोक केला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. खामगांव येथे जिल्ह्य़ातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असून येथे १५० पेक्षा जास्त उद्योग आहेत. त्यात १० हजार कामगारांची उपजीविका चालते. त्यामुळे हे उद्योग बंद पडल्यास कामगारांवर उपासमारीची पाळी येऊ शकते.