नवरात्रीची धुपन आणि आयुर्वेद Print

डॉ. माधुरी वाघ -४२२१०९९९३
अगरू- अगरबत्तीतील अगर

alt

देवासमोर भक्तिभावाने लावली जाणारी सुगंधी अगरबत्ती ही पूर्वी अगर वृक्षाच्या काण्डसारापासूनच तयार केली जात होती. म्हणूनच तिला ‘अगरबत्ती’ हे नाव मिळाले. अगरू म्हणजेच अ‍ॅक्विलारिया अ‍ॅगाल्लोचा या झाडाच्या नैसर्गिक सुगंधी काण्डसाराच्या निर्यासापासून धूप करण्यास बनविलेली काडी म्हणजेच ‘अगरबत्ती’. आजच्या आधुनिक काळात अनेक प्रकारच्या कृत्रिम सुगंधी अगरबत्त्यांचा वापर वाढला आहे. त्याने सुगंधाचा क्षणिक आनंद मिळतो; परंतु पर्यावरण रक्षणाचा, वातावरण र्निजतुकीकरणाचा रक्षोघ्न गुण त्यात नाही म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने तरी खऱ्या अगरूचाच धुपनार्थ उपयोग करून वातावरण शुद्ध ठेवले पाहिजेत.
या अगरूला बंगाल, गुजराथमध्ये अगर, तर पंजाबमध्ये ऊद म्हणतात. अगर निर्यासाच्या रंग व सुगंधावरून चार प्रकार आढळतात. १) कृष्णागरू, २) काष्ठागरू, ३) दहागरू, ४) मंगलागरू. हा अगरू वृक्ष उत्तर भारतात हिमालय, आसाम, मणिपूर, बांगलादेश, भूतान, ब्रह्मदेश, सुमाना येथे सहज सर्वत्र आढळतात. हा अगरू २० मीटपर्यंत उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो. याच्या बुंध्याची साल कागदाप्रमाणे पातळ असल्याने पूर्वी तिचा भूर्जपत्राप्रमाणे लिहिण्यासाठी उपयोग करीत असत. याचे खोड पांढरे पिवळसर व मऊ असते. त्याला गंध नसतो, पण हा वृक्ष जुना झाल्यावर कृमिमुळे किंवा एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे खोडाच्या आतील सालीत तैलीयराळ (एसिन) तयार होते. ज्यामुळे अगरू खोडात काळसर रंग, जडपणा व सुगंध निर्माण होते. हाच ‘कृष्णागरू’ होय. हा अतिशय सुगंधी, पाण्यात बुडणारा, जड, असा श्रेष्ठ अगरू असतो. जळताना अधिकच सुगंध दरवळतो. ५० वर्ष जुन्या वृक्षापासून ३-४ किलो अगरू निर्यास मिळतो.
या अगरूच्या फांद्या वेडय़ावाकडय़ा असून त्याचे खोड नरम असते. त्याचा औषधात उपयोग होतो. याची चव कडवट, तुरट, तेलकट असते. यापासून मिळणारे तेल त्वचारोगात लेप लावण्यासाठी वापरतात. सुगंधामुळे हे तेल उत्तेजक आहे. या तेलाचा कानात टाकून कर्णरोग निवारणासाठी उपयोग होतो. कोडाचे पांढरे डाग कमी होण्यास अगरू तेल लावतात. सांधेदुखीतही वेदनास्थानी तेल चोळतात. सर्दी, खोकला, दमा अशा श्वासाच्या विकारात अगरूचे १-२ थेंब तेल विडय़ाच्या पानात टाकून खायला देतात. नस्य करण्यास नाकातही थेंब टाकतात. बाजारात उपलब्ध अणूतेलातील अगरू हा महत्त्वाचा घटक आहे.
अगरूची उत्पत्ती थंड प्रदेशात होते. याचा प्रमुख उपयोग शीत प्रशमन म्हणजेच थंडीपासून निवारण करणे होय. अगरु गरम असल्याने थंडीत याचा लेप लहान मुले, वृद्धलोक यांच्या तळ हातपाय, छातीवर, कापडावर लावतात किंवा अगरू तेल गरम करून चोळतात. मालीश करतात.
मुखाची दरुगधी कमी करण्यास अगरूचा तुकडा सुपारीप्रमाणे तोंडात धरतात. याने अपचनाचे विकार, पोटाचा फुगारा व वायुदोष कमी होतो. लहान मुलांमध्ये होणाऱ्या शय्यामुत्रतेत म्हणजे झोपेत अंथरूण ओलं करणे यात दोन थेंब दुधात टाकून देतात. सुगंधी उटण्यातही अगरू वापरतात. वस्त्राला सुगंध येण्यास अगरूचा तुकडा कपडय़ात ठेवतात. त्यापासून इसेन्स, परफ्युम बनवितात. थकवा घालविण्यास याचे चूर्ण पाण्यात टाकून घेतल्यास याने हुशारी वाढून तरतरीतपणा येतो. असा औषधी उपयोगी अगरू महाग आहे; परंतु नवरात्रीत धुपनार्थ वापरून मानसिक प्रसन्नता वाढण्यास व बाह्य़ प्रदूषण कमी करण्यास तो वापरलाच पाहिजे.
कापूर
alt
देवीच्या पूजेतील शेवटचा भाग म्हणजे आरती. त्यातही कापूर आरती. लवकर जळून धूर होणारा कापूर हा धुपाचाच एक प्रकार आहे. कापूर सहज उपलब्ध व स्वस्त असल्याने नियमित वापरला जातो. त्याने खरोखरच देवघरातील किंवा मंदिरातील वातावरण मंगलमय होते. हा कापूर (कँफर सिन्नामोमम) या कर्पूर झाडाचा पांढरा स्वच्छ सारभाग किंवा निर्यास आहे.
कापूर मूळ केनियाचा असून चीन, जपान, कोरिया, तायवान येथे कापराची खूप झाडे आहेत. ऑस्ट्रेलियात तर नैसर्गिक जंगलच आहे. यापासून तेल काढण्यासाठी चीन, जपानमध्ये खास व्यवसाय म्हणून लावली जातात. म्हणून वेगवेगळ्या देशातील उत्पन्नावरून कापूर तीन प्रकारचा आहे. १) भिमसेनी कापूर- सुमात्रा, बोर्निया या देशामधील झाडांच्या ढोलीत हा कापूर मिळतो. यापासून उत्तम कापूर तेल मिळते. २) चिनी कापूर- चीन, जपान, भारत विशेषत: निलगिरी पर्वतावर विशेष लागवड करतात. ३) भारतीय कपूर- मूळचा केनियातील असला तरी भारतात जम्मू, महाराष्ट्र व कर्नाटकात आढळतो. याची पाने तुळशीप्रमाणे दिसतात. सुगंधी असल्याने त्यापासून ७० ते ८० टक्के कापूर मिळतो.
कापराचे झाड त्याच्या सुगंधाने विशेषत: पाने चुरगळल्याने येणाऱ्या वासाने कुठेही ओळखता येतात. हे पूर्ण झाडच पांढरं दिसतं. कापराची सदाहरित ५० ते १५० उंचीचे वृक्ष असल्याने सावलीसाठीही लावतात. कापराचे लाकूड हलके, मऊ, आकर्षक लालपिवळे पट्टे असणारे सहज सुंदर पॉलिश होत असल्याने फर्निचरसाठी वापरतात. कापूर चवीला कडवट, तिखट, तीक्ष्ण पण थंड असतो. औषध म्हणून अल्प प्रमाणात सांभाळून वापर करावा लागतो. कारण जास्त प्रमाणात विषारीही आहे. म्हणून त्याचा बाह्य़ उपयोग करावा. कापूर तेल औषधी उपयोगी आहे. जे घरच्या घरी सहज तयार करता येते. यासाठी १ पाव कापराला १ किलो खोबरेल घ्यावे. सर्वप्रथम खलात कापूर घेऊन बारीक करावे. नंतर त्यात थोडे थोडे तेल टाकून सतत घोटावे. चांगले मिसळल्यावर बाटलीत भरून ठेवावे. आवश्यक असेल तेव्हा वापरता येतात. या तेलाचा उपयोग आमवात, सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीवर वेदना कमी होण्यास उत्तम परिणामकारक आहे. दातदुखीवर कापसाच्या बोळ्यात ठेवून कापूर दातात ठेवतात. मुखदरुगधीवर दंतमंजनात कापूर टाकतात. सर्दी, खोकला, दमा अशा विकारात कफ सहज बाहेर पडण्यास कर्पूरासव देतात. लालास्त्राव वाढून योग्य अन्नपचन होण्यास, अतिसार, प्रवाहिकेत हिंगुकर्पूरवटी परिणामकारक आहे.
मनाला प्रसन्न करणारा मंगळमय कापूर ह्रदय उत्तेजक, ह्रदय संरक्षक आहे. रक्तवाहिन्याचा संकोच करत असल्याने रक्तदाब वाढवून ह्रदयाची गती, बल नियमित करतो. पोटातील कृमी किंवा जंतावर कापूर गुळाबरोबर व बाहेरील त्वचा किंवा केसातील कृमीवर कडूनिंबाच्या रसात खलून कापूर लावावा. आंघोळीसाठी किंवा केस धुण्यास कापराचा अर्क असलेले कर्पूरपाणी वापरावे. कर्पूरपाणी तयार करण्यास कापराचे सूक्ष्म चूर्ण एका पोटलीत बांधावे, ती पोटली एका भांडय़ात पाणी घेऊन त्यात पूर्ण बुडेल अशी आठ दहा तास ठेवावी. याने कापराचा अर्क पाण्यात उतरतो. हे उत्तेजित करणारे असल्याने स्नानानंतर एकदम तरतरीतपणा येतो. प्रसन्न वाटते. अशा या प्रसन्नता वाढविणाऱ्या कापूर आरतीने, धूपदीपाने पूजेचा आनंद द्विगुणित होतो. म्हणून कापूर आरतीला देवीपूजेत मानाचे स्थान आहे.