आरोग्य सेवा कोलमडली Print

चंद्रपूर महापालिका आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जीवाशी निव्वळ खेळ
चंद्रपूर / प्रतिनिधी
महानगरपालिकेची आरोग्य सेवा कोलमडली असून डॉक्टर, परिचारिका, परिचर व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांअभावी शहरातील चार आरोग्य केंद्र नुसती दाखवण्यासाठी सुरू असली तरी सेवा पूर्णत: ठप्प आहे. इंदिरानगर केंद्रात डॉक्टर नसल्याने परिचारिका उपचार करत असल्याची, तर बाबुपेठ केंद्रात   मुदतबाह्य़ औषधांचा पुरवठा रुग्णांना करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या अचानक भेटीत समोर आली.
साडेचार लाख लोकसंख्येच्या या शहरात महानगरपालिकेचे बाबुपेठ, इंदिरा नगर, बगड खिडकी व बालाजी वॉर्ड, असे चार आरोग्य केंद्र आहेत, तर सिव्हील प्रभागात संजय गांधी मार्केटमधील आरोग्य केंद्र बंद पडलेले आहे. या चार आरोग्य केंद्रांच्या प्रमुख म्हणून नोडल ऑफिसर डॉ. अंजली आंबटकर  आहेत, तर प्रत्येक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर आणि तज्ज्ञ कर्मचारी आहेत, परंतु महापालिकेच्या या चारही आरोग्य केंद्रांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे.
 स्थायी समितीचे सभापती नंदू नागरकर, डॉ. अंजली आंबटकर यांच्या पथकाने या चारही केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली असता ही दुरवस्था समोर आली. तुकूम आरोग्य केंद्रात लिंक वर्कर नाही. आरोग्य केंद्र उघडण्याची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतांना बऱ्याचदा ते बंद असते. प्रभागातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडय़ातून सोमवार आणि गुरुवार, असे दोनच दिवस केंद्र सुरू करण्यात येते. इंदिरा नगर केंद्रात तर वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने परिचारिकाच रुग्ण तपासणी करून त्यांना औषध देतांनाचे चित्र बघायला मिळाले. रुग्णांची गर्दी असलेल्या या केंद्रात औषधांचा तुटवडा होता, तर बाबुपेठ आरोग्य केंद्रात याहीपेक्षा वाईट स्थिती होती. सर्वत्र अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य होते. जंगलाला लागून असलेल्या बाबुपेठ प्रभागात मलेरियाने थमान घातले आहे. त्यामुळे ताप, साथीच्या आजाराचे रुग्णांची गर्दी आहे.
या सर्व रुग्णांना बिकॉम्पलेक्सच्या मुदतबाह्य़ गोळय़ा परिचारिक देत होत्या. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर पुरवठादाराकडून याच गोळय़ा मिळाल्याचे सांगण्यात आले. पालिकेला चांडक यांच्या एजन्सीकडून औषधांचा पुरवठा करण्यात येतो. पुरवठादाराने या औषधांचा पुरवठा केल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली. गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम सुरू आहे. तसेच या केंद्रात परिचारिका व कर्मचारी नाही.
बालाजी वॉर्डातील आरोग्य केंद्राची अवस्था तर सर्वात वाईट आहे. स्वच्छतेचा मागमूसही नाही. हे केंद्र कधी सुरू होते आणि कधी बंद, याची माहिती तर या प्रभागातील लोकांनाही नाही. सभापती व आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या बाबी आल्यानंतर सर्वप्रथम मुदतबाह्य़ औषधांचे वाटप बंद करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शहरात दहा केंद्रे सुरू करण्यात आली. यातील पाच केंद्रे बंद करण्यात आली असून पाच सुरू आहेत. आता पालिकेने ही योजना बंद करण्याचा ठराव घेतल्याने हे पाचही केंद्रे बंद आहेत. एकूणच महानगरपालिकेची आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडलेली आहे.
सेवेच्या नावावर निव्वळ रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हा खेळ त्वरित बंद करून प्रभागातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने केंद्र सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.