नवे वीज मीटर सदोष, काळ्या यादीतील कंत्राटदाराची मनमानी Print

प्रत्यक्ष वापरापेक्षा शेकडोपट बिलांनी ग्राहक हैराण
सोमनाथ सावळे , बुलढाणा
महावितरणने ग्राहकांना नवीन डिजिटल मीटर दिल्यानंतर त्यांना दुप्पट तिप्पट बिले येऊ लागली आहेत. महावितरणचा भोंगळ कारभार, कंत्राटदाराची मनमानी, त्याच्यावर अधिकाऱ्यांचे नसलेले नियंत्रण, विद्युत वापरापेक्षा कितीतरी अधिक तांत्रिक सदोष व चुकीचे येणारे रिडिंग, यामुळे ग्राहकांना गंडविण्याचा एक कलमी कार्यक्रम महावितरणने चालविला आहे. महावितरणच्या बुलढाणा उपविभागात वाढती बिले आलेल्या शहरी व ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांनी त्याचा जाब विचारण्यासाठी व ते दुरुस्त करण्यासाठी आठवडय़ाभरापासून तोबा गर्दी केली आहे.
महावितरण कंपनीने शहरी व ग्रामीण भागातील विद्युत ग्राहकांना नवीन डिजिटल मीटर दिले आहेत. ते अधिक पळणारे व तांत्रिकदृष्टय़ा सदोषही असल्याने पूर्वीपेक्षा तिप्पटीने रिडिंग येत आहे. महावितरणने घरगुती विद्युत वापराचे दर वाढविले आहेत. अधिकचे रिडिंग व वाढलेले दर यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा तिप्पट बिले येत आहेत. असे कसे होते, हे विचारण्यासाठी व ती दुरुस्त करण्यासाठी बुलढाणा महावितरण उपविभागात तोबा गर्दी होत आहेत. बिल दुरुस्त करून देणाऱ्या लिपिकाचे तोंडही दिसत नाही, एवढी ही गर्दी आहे. ग्राहकांना टाळण्यासाठी बुलढाणा उपविभागाचे सहाय्यक अभियंता कार्यालयात उपस्थितच रहात नाहीत. महावितरणच्या बुलढाणा सर्क ल, विभाग व उपविभागीय कार्यालयाने विद्युत बिलांचे रिडिंग घेणाऱ्या व देयके देणाऱ्या कंत्राटदाराचे विशेष लाड पुरविणे सुरू केले आहे. यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्यावर धावून जाणाऱ्या व त्यांच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या या कंत्राटदाराच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा आदेश महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयाने अकोल्याचा मुख्य अभियंत्याला दिल्यानंतरही बुलढाणा अधीक्षक अभियंता कार्यालयाने या कंत्राटदार कंपनीस पाठिशी घातले आहे.
नवीन डिजिटल मीटर लावल्यानंतर त्याचे शेवटचे व्यवस्थित रिडिंग महावितरण व कंत्राटदाराने घेतलेले नाही. त्यानंतर कंत्राटदार कंपनीने मिटरचे तंतोतंत रिडिंग न घेता ग्राहकांना आर.एन.ए. म्हणजेच रिडिंग उपलब्ध नाही, अशा प्रकारचा उल्लेख असलेली बिले दिली. ती कुठे तिप्पट चौप्पट, तर कुठे पन्नास पट होती. बुलढाण्यात तर चारशे रुपये बिल येणाऱ्या ग्राहकास चक्क  बावन्न हजाराचे बिल देण्यात आले. यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारीवरून बुलढाण्याचे आमदार विजयराज शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी रिडिंग घेतलेली बिले कंत्राटदाराने ग्रामीण भागातील ग्राहकांच्या घरापर्यंत न पोहोचता अंदाजे देयके दिली. ही बिले चार-पाच पट होती. त्यामुळे ग्रामीण विद्युत ग्राहक हवालदिल झाले होते. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आल्यानंतर या उपविभागाने पूर्वीच्या रिडिंगच्या तुलनेत ग्राहकांना बिले दिली.
ग्राहकांना अशी अव्वाच्या सव्वा बिले दिल्यानंतर ते भरण्यासाठी त्यांच्याकडे तगादाही लावला जातो. ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जाते. ग्राहकांना बिलांसाठी सतवणारे महावितरणचे क निष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता नवीन विद्युत जनित्र, विद्युत खांब व विद्युत तारांच्या मजुरी क रार कंत्राटात कंत्राटदाराशी संगनमत करून आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे चुकीचे मोजमाप करून पुस्तके रेकॉर्ड करून चुकीची बिले अदा करतात. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व ग्राहक हित संरक्षण मंत्रालयाने सखोल चौकशी करून ग्राहकांना छळणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात बुलढाण्याचे सहाय्यक अभियंता सोहोनी यांची सोमवारी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात अनुपस्थित होते. तेथील वरिष्ठ लिपिकांना विचारणा केली असता संबंधित अधिकारी अनुपस्थित असण्याबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या संदर्भात कार्यकारी अभियंता आकोडे यांना विचारणा केली असता प्रचंड देयके येण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. मीटर तांत्रिक सदोष असण्याबाबत त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. काळया यादीतील कंत्राटदार कंपनी रिडिंग व देयक वाटपाच्या संदर्भात त्यांना विचारणा केली असता, त्यांनी हे अधिकार अधीक्षक अभियंता कार्यालयाला असल्याचे सांगितले.
अधीक्षक अभियंता कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या संदर्भात प्रकाशगडचे चार महिन्यापूर्वी पत्र प्राप्त झाले, मात्र ते पत्र कारवाईशिवाय दाबून ठेवण्यात आल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजले आहे.