‘लेक वाचवा’अभियानाची क्रूर थट्टा Print

यवतमाळात सापडली झुडपात जिवंत चिमुकली तर तुमसरमध्ये कुत्र्यांनी खाल्लेले अर्भक
यवतमाळ / भंडारा / वार्ताहर ,
सर्वत्र कन्याभ्रुण हत्येचा कडाडून विरोध आणि ‘लेक वाचवा’ अभियान सुरू असतांनाच यवतमाळात झुडपात चार दिवसांची जिवंत मुलगी, तर तुमसरमध्ये वर्दळीच्या ठिकाणी एक दिवसाचे अर्भक अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सुलभ शौचालयाजवळील झुडपात एका कापडात गुंडाळलेली चार दिवसांची जिवंत मुलगी आढळून आली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष डोमाळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणून दिली तेव्हा त्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुण्यातरी अज्ञात महिलेने प्रसुतीनंतर हे क्रूत्य केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे.  शहर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दुसरी घटना भंडारा जिल्ह्य़ातील तुमसरची आहे. भरदिवसा तुमसर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी एक दिवसाचे अर्भक अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. अर्भकाचा कंबरेपासून खालचा भाग पूर्णपणे कुत्र्यांनी खाल्ला आहे. या संदर्भात तुमसर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शहरातील बसस्थानकापासून पुढे गावात जाणाऱ्या प्रमुख मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ हा प्रकार उघडकीस आला. रेल्वे लाईनपासून एका कुत्र्याच्या तोंडात हे अर्भक नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी कुत्र्याचा पाठलाग करून ते त्याच्या तावडीतून सोडविले.
कामगार न्यायालयाजवळ कुत्र्याने त्या अर्भकाला टाकून दिले, मात्र त्यावेळी अर्भकाचा कमरेखालचा भाग पूर्णपणे खाल्लेला होता. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. हे अर्भक मुलगा की मुलगी, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.  
दरम्यान, तुमसर पोलीस ठाण्यात मुलगा चोरीची किंवा नर्सिग होममधून गायब होण्याची कोणतीही तक्रार नसल्याने अनैतिक संबंधातून जन्माला आल्यानंतर मुलाला फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकारामुळे तुमसर शहरात एकच चर्चा सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक ठाकूर प्रकरणाचा तपास करीत आहेत.